‘बिग बॉस १७’मुळे चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. अंकिता लोखंडेसह तिचा पती विकी याने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता. ‘बिग बॉस’च्या घरात आल्या दिवसापासून ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली. सुरुवातीला त्यांच्यातील प्रेम त्यानंतर त्यांच्यातील विकोपाला गेलेले वाद, विवाद यांमुळे ही जोडी नेहमीच लक्षवेधी ठरली. ‘बिग बॉस’मध्ये असताना दोघांनीही एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे या जोडीला बराच ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. दरम्यान अंकिताच्या सासरच्या मंडळींनीही तिच्यावर आरोप केलेले पाहायला मिळाले. (Ankita Lokhande Statement)
विकी जैनबरोबर अंकिता तिचा एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतमुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस’च्या घरात कित्येकदा अंकिता सुशांतच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळाली. हे सर्व ती सहानुभूतीसाठी करत असल्याचंही अनेकांनी म्हटलं. नुकत्याच झूम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिच्यावर केल्या गेलेल्या या आरोपांबाबत भाष्य केलं आहे.
‘बिग बॉस’मध्ये अंकिता व विकी यांच्यातील भांडण पाहता हे दोघे घटस्फोट घेणार की काय अशी चर्चा होती. यावर मौन सोडत अंकिता म्हणाली की, “मला असं वाटतं की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्यावर तुम्ही प्रेम करत राहीलं पाहिजे. त्याच्या डोक्यावर बसून जरी नाचलात तरी काही फरक पडत नाही. कारण जर तो तुमच्यावर प्रेम करत असेल, तर तो तुमच्याबरोबर कोणत्याही परिस्थितीत राहील. तो दुसरीकडे कुठेच जाणार नाही”, असं अंकिता विकीबद्दल म्हणाली.
तर सुशांत सिंहच्या नावाचा सतत उल्लेख करण्याबाबत ती म्हणाली की, “मला असं वाटतं की हे माझं आयुष्य आहे. जर मला एखादी व्यक्ती माहीत असेल, त्या व्यक्तीविषयी मला काही चांगली माहिती असेल तर त्याबद्दल मी नक्कीच बोलेन. कोणीच मला थांबवू शकत नाही. याव्यतिरिक्त जर तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर ती तुमची मतं आहेत. त्यावर मी काहीच बोलू शकत नाही”.