Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ च्या घरात अंकिता लोखंडे अनेकदा तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना दिसली आहे. तिचा प्रियकर असलेल्या दिवंगत सुशांत सिंह राजपूतबद्दल ती अनेकदा बोलत असते. सात वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आलेला पाहायला मिळाला. अंकिता नेहमीच सुशांतच्या बाजूने उभी राहिली. ‘बिग बॉस’च्या मागील भागात अंकिता लोखंडेने पुन्हा एकदा मुन्नवर फारुकीसह सुशांतबद्दल चर्चा केली. यावेळी तिने सुशांतचा शेवटचा फोटो पाहिल्यानंतर काय झाले याबद्दल भाष्य केलं. सुशांतचे चाहते ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
मुन्नवर फारुकीशी संवाद साधताना अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. इतकंच नाही तर सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो पाहून त्यावेळी नेमकं काय झालं याबद्दलही सांगितलं. सुशांतच्या मृत्यूबद्दल अंकिता म्हणाली, “जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला वाटले की सर्व काही संपले आहे. त्याने बरेच चित्रपट केले, ते सर्व संपलं आहे”.
अंकिता पुढे म्हणाली, “त्याचा एक फोटो होता जो खूप वाईट होता. तो फोटो पाहून माझे हात पाय थंड पडत गेले. तो फोटो पाहून तो झोपला आहे असे वाटत होते. मी केवळ त्या फोटोकडे पाहत राहिले आणि विचार केला की त्याच्या मनात किती साठलं आहे. मी त्याला चांगलं ओळखायचे, त्याच्या मनात खूप काही होत पण ते सगळं नाहीसं झालं. कारण ती व्यक्ती नसून केवळ एक देह होता”असंही ती म्हणाली. मुन्नवर याने सुशांतच्या कुटुंबाबद्दल विचारले असता अंकिताने तो बिहारचा असल्याचे सांगितले.
मुन्नवरने विचारले, “त्याचे कुटुंब बिहारमध्ये होते का?” अंकिता म्हणाली, “नाही. त्यांची एक बहीण अमेरिकेत होती, दुसरी चंदिगडमध्ये होती आणि वडील पटणा किंवा दिल्लीत राहत होते. त्यांचं कुटुंब अतिशय सुशिक्षित कुटुंब असून ती उच्चशिक्षित लोक आहेत. अंकिताने पुढे सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितले की, “तो खूप हुशार होता. डोळ्यादेखत तो गणिते सोडवत असे. सुशांत आयआयटीचा विद्यार्थी होता आणि त्याने भारतातील आयआयटीमध्ये सातवा क्रमांक मिळवला होता” असंही ती म्हणाली.