‘बिग बॉस १७’ हे पर्व विशेष गाजलं. यंदाच्या स्पर्धकांमुळे हे पर्व चर्चेतही राहील. नुकताच ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाने निरोप घेतला असून यंदाचं विजेतेपद सुप्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने पटकावलं आहे. मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला असून उपविजेतेपद अभिषेक कुमार यांस देण्यात आलं आहे. तर मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे व अरुण माशेट्टी हे स्पर्धक टॉप ५ मध्ये होते. यंदाचं पर्व एका सेलिब्रिटी कपलमुळे विशेष चर्चेत राहिलं. ते म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. (Ankita Lokhande Troll)
अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावली होती. अगदी पहिल्या दिवसापासून ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अंकिता विकी यांच्या खेळामुळे तसेच त्यांच्यातील सततच्या भांडणामुळे ही जोडी लक्षवेधी ठरली. काहींना अंकिता व विकी यांचा खेळ, यांच्यातील बॉण्डिंग आवडत होतं तर काहींना दोघांचं वागणं आवडत नव्हतं.
अंकिता व विकी यांच्यातील भांडणामुळे दोघे चर्चेत आले. दरम्यान अंकिताने विकीवर बरेच आरोप केलेले पाहायला मिळाले. विकी मुलींच्या सहवासात जाताच अंकिताला असुरक्षित वाटत असल्याचंही तिने यावेळी बोलून दाखवलं. शिवाय विकी तिला वेळ देत नसल्याची तक्रारही अभिनेत्रीने केली. कालांतराने दोघानमधील वाद विकोपाला गेलेला पाहून अनेकांना दोघेही वेगळे होणार की काय असा प्रश्न पडला होता. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र दोघेही पार्टी करताना दिसले. विकीने, ‘आमच्यात सर्वकाही ठीक असल्याचं’ त्याने म्हटलं.
शोमधून बाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रित केले होते. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरातील माजी स्पर्धकही उपस्थित होते. अंकिताच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान समोर आलेल्या एका व्हिडीओने चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘बिग बॉस’ स्पर्धक नवीद सोलेशी जवळीक साधताना दिसली. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. यावेळी नेटकऱ्यांनी, “हेच जर विकीने केलं असत तर…”, “विकीने केलं असत तर त्याला स्त्रीवादी म्हटलं असतं”, “विकीने हे मन्नाराबरोबर केलं असतं तर तुला असुरक्षित वाटलं असतं” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.