Bhushan Patel New Marathi Movie : ‘१९२० इव्हल रिटर्न’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ यांसारख्या सुपरहिट हॉरर-थ्रिलर चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर भूषण पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यांच्या या चित्रपटात महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने मुख्य भूमिका साकारली असून डॅशिंग लूकमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे दमदार डायलॉग्स सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी ‘पी.एस.आय.अर्जुन’ची छोटीशी झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली, ती पाहून या चित्रपटात बॉलिवूडचा टच असल्याचे दिसतेय. भूषण पटेल यांची बॉलिवूडमधील चित्रपटांची खासियत पाहाता ‘पी.एस.आय.अर्जुन’मध्येही काहीतरी रहस्यमय पाहायला मिळणार, हे नक्की.
मराठीतील पदार्पणाबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, “मी स्वतःला अमराठी समजतच नाही. माझा जन्म मुंबईमध्ये झाल्यामुळे मराठी भाषा माझ्या खूप जवळची आहे. मी मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेण्यामागचे मुख्य कारण असे की, कथाकथन ही एक वैश्विक भाषा आहे. ‘पी. एस.आय.अर्जुन’ या चित्रपटाची कथा ऐकताच या चित्रपटाकडे मी आकर्षित झालो. ही फक्त क्राईम थ्रिलरची संकल्पना नाही तर पात्रांचे क्लिष्ट मानसशास्त्र, नैतिक गुंतागुंत आणि कथन या सगळ्याच गोष्टी उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. एक दिग्दर्शक म्हणून मला नेहमीच असे कथानक आवडते, जे प्रेक्षकांना स्पष्टपणे विचार करण्याचे आणि नवीन काही अनुभवण्याचे आव्हान देतात. त्यात सुपरस्टार अंकुश चौधरीसह मराठीतील अनेक मान्यवर कलाकार आहेत. मराठी कलाकारांसोबत काम करणे, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात चांगला अनुभव होता. मराठी कलाकार ज्याप्रकारे भूमिका साकारतात ते अतिशय प्रेरणादायी आहे. ते पात्रांना जिवंत करतात. यात सर्व कलाकारांनी उत्तम काम केले असून अशा प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणे ही एक माझ्यासाठी सुवर्णसंधी होती.”
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातील फरकाबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, ”मराठी आणि हिंदीमध्ये दिग्दर्शन करताना मला अतिशय वेगळे अनुभव आले. ते दोन्ही त्यांच्या स्वत: च्या जागी प्रगल्भ आहेत. मराठी सिनेमाला एक वेगळी सत्यता आहे. चित्रपटाची कथा अनेकदा सांस्कृतिक आणि भावनिक बारकावे, भाषेची लय या गोष्टींवर आधारित असते. तर हिंदी चित्रपट अनेकदा व्यापक आणि मुख्य प्रवाहात आकर्षण करणारे असतात. इथे जीवनापेक्षा मोठ्या कथा, नाट्यमय क्षण आणि भावनांवर भर दिला जातो. दोन्ही भाषा भावनिक सत्याची मागणी करतात, परंतु मराठीत कमी बोलून आपण जास्त व्यक्त होऊ शकतो. मराठी चित्रपटसृष्टीला कथाकथनाची समृद्ध परंपरा आहे”.
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित, विक्रम शंकर प्रस्तुत ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.