बॉलिवूड अभिनेते राजपाल यादवने आपल्या अनेक विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना अक्षरश: रडेपर्यंत हसवलं आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मात्र अभिनेता नुकताच त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असतानाच, अभिनेत्याला दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला दिवाळीचा व्हिडिओ डिलीट तर करावा लागला आहे. पण त्याबद्दल त्याने एक नवीन व्हिडीओ पोस्ट शेअर करून माफीही मागितली आहे. त्याला हा व्हिडीओ केवळ डिलीट करावा लागला नाही तर नव्या पोस्टद्वारे चाहत्यांची माफीही मागावी लागली आहे. (Rajpal Yadav Apologized)
राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांची माफी मागितली आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने हात जोडून सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला गेला होता. मी तो व्हिडीओ हटवला आहे. या व्हिडीओमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो”. तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने असं म्हटलं आहे की, “मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश दिवाळीच्या आनंदाला कमी करणे नव्हता… दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंद आणि प्रकाशाचा सण आहे आणि तो सर्वांसाठी सुंदर बनवणे हाच खरा सण आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि प्रेम. चला, आपण मिळून ही दिवाळी खास बनवूया”.
दोन दिवसांपूर्वी राजपाल यादवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने लोकांना सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. यात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून दिवाळीत फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. तसेच, फटाक्यांच्या आवाजामुळे प्राण्यांना भीती वाटते असेही त्याने सांगितले. मात्र, या व्हिडीओवर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगमुळेच अभिनेत्याने आता चाहत्यांची माफी मागितली आहे.
आणखी वाचा – ‘द डर्टी पिक्चर’चा सिक्वल येणार, विद्या बालननेच केला खुलासा, आता कसा असणार लूक?
दरम्यान, अभिनेता आगामी ‘भूल भूलैया ३’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘भूल भुलैया ३’ मध्ये राजपाल यादवची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रुह बाबा’च्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित या नवीन कलाकारांचीही चित्रपटात भर पडली आहे.