छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचं निधन होऊन नऊ वर्ष झाली आहेत. कथितपणे प्रत्युषानं २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मैत्रिणीने यासाठी प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला जबाबदार ठरवलं होतं. आता नऊ वर्षांनंतर राहुल राज सिंगनं धक्कादायक खुलासा केला आहे आणि काम्या पंजाबीवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल राज सिंहनं सुभोजीत घोषच्या यूट्युब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत प्रत्युषाच्या कथित आत्महत्येविषयी सांगितलं. त्याशिवाय हे देखील सांगितलं की, अभिनेत्रीच्या निधनासाठी त्याला का जबाबदार ठरवण्यात आलं. (rahul raj singh on pratyusha banerjee death)
प्रत्युषाला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा जिवंत असल्याचा दावा राहुल राजने केला होता. प्रत्युषाचा मृत्यू हॉस्पिटलच्या औपचारिकतेला उशीर झाल्यामुळे झाल्याचा आरोप राहुलने केला आहे. याबद्दल राहुल राज सिंह म्हणाला, “औपचारिकता आणि प्रक्रिया इतकी लांब होती की, प्रत्युषाला प्रवेश मिळण्यासाठी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला आणि या सगळ्यात तिचा मृत्यू झाला. राहुलनं प्रत्युषाची हत्या केली. हेच मी अनेक मीडिया चॅनेलवर पाहिलं आहे”. पुढे त्याने दावा केला की, प्रत्युषावर कोणतंही आर्थिक संकट नव्हतं आणि तिच्याकडे काम देखील होतं.
राहुल राजनं पुढे काम्या पंजाबीविषयी बोलत सांगितलं की, “काम्यानं प्रत्युषाकडून अडीच लाख रुपये उधार घेतले. मी काम्याला ओळखत सुद्धा नव्हतो. एकदा एका पार्टीत प्रत्युषानं माझी आणि तिची भेट घडवून आणली होती. तेव्हा काम्या पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होती”. राहुल राजनं पुढे सांगितलं की, “प्रत्युषानं काम्याला जवळवास दोन ते अडीच लाख रुपये दिले होते आणि तिने काम्याला पैसे परत देण्यास सांगितलं होतं. पण काम्यानं सांगितलं की, तिच्याकडे आता काही काम नाही. त्यामुळे ती नंतर पैसे परत देईल”.
दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी राहुल राज सिंहविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राहुलला तुरुंगातही जावे लागले होते. मात्र, नंतर राहुल राज सिंहने आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात केली आणि लग्न करुन संसाराला सुरुवात केली होती. या प्रकरणात आपल्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे राहुल म्हणाला आहे.