‘बालक पालक’ या लोकप्रिय मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्री ही मराठी सिनेसृष्टीतील काही अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘बालक-पालक’, ‘आनंदी गोपाळ’, ‘उबूंटू’ अशा अनेक चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे भाग्यश्री खूपच लोकप्रिय आहे.
पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबंटू’ या चित्रपटात भाग्यश्री मिलिंदने ‘गौरी’ ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास्पद होता. यानंतर समीर विद्वांस यांच्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात अभिनेत्रीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिससह अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही नावाजला गेला होता. तसेच या चित्रपटातील भाग्यश्रीच्या भूमिकेचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.
मराठीतील ‘बालक पालक’, ‘आनंदी गोपाळ’, ‘उबुंटु’ व ‘३५ टक्के काठावर पास’ या लोकप्रिय चित्रपटांनंतर भाग्यश्री सध्या मराठी मनोरंजन सृष्टीपासून लांब असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री सध्या गुजराती रंगभूमीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गुजराती रंगभूमीवरील ‘एक छोकरी साव अनोखी’ या नाटकाद्वारे भाग्यश्री प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. भाग्यश्री या नाटकात मुख्य भूमिकेत असून या नाटकाला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा – सोशल मीडियावर का नाही आहे राणी मुखर्जी?, स्वत:च खुलासा करत म्हणाली, “साधे जीवन…”
‘एक छोकरी साव अनोखी’ हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘अनन्या’ या नाटकाचे गुजराती भाषेतील रूपांतर आहे. मराठीतील ‘अनन्या’ नाटकाचे दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिकेत होती. तसेच या नाटकावर आधारित ‘अनन्या’ हा चित्रपटही आला होता. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत होती.
भाग्यश्रीने मराठी चित्रपटांसह ओटीटी माध्यमावरही तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘अथांग’ या मराठी वेबसीरिजमध्ये भाग्यश्रीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. दरम्यान, भाग्यश्री आता मराठी चित्रपटांतून दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.