“नावात काय आहे?” असं शेक्सपिअरने म्हटलं आहे. पण “नावात काय आहे” असं म्हणणारा शेक्सपिअर या वाक्यानंतर स्वत:चं नाव घेतोच. अनेकदा सारखी नाव व सारखी आडनाव असणारी अनेक माणसं आपल्याला दिसतात. पण याच सारख्या नावांमुळे अनेकदा गोंधळ होतो. मराठी सिनेसृष्टीतही सारख्या नावाचे अनेक कलाकार आहेत. पण सारखं नाव व सारखं आडनाव असलेलं एक लोकप्रिय नाव या क्षेत्रात आहे ते म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी या सारख्या नावाच्या व सारख्या आडनावाच्या अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात असून दोघी आपलं नाव गाजवत आहेत. मात्र यापैकी जुन्या म्हणजेच मोठ्या सोनाली कुलकर्णी यांनी मला माझ्या नावाचा त्रास होत असल्याचे सांगितले.
सोनाली कुलकर्णी यांनी नुकतीच अमृता राव यांच्या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना सोनाली कुलकर्णी हे नाव सारखंच असल्यामुळे नेमके कोणते अनुभव आले आहेत? असा प्रश्न विचारला. यावर सोनाली यांनी असं म्हटलं की, “माझ्याकडे अशा खूप दर्दभऱ्या कहाण्या आहेत. मला माझ्या नावाचा इतका त्रास होतो की मी काही सांगू शकत नाही. मला वाईट वाटतं की इतके काम करुनही मला दररोज सांगावं लागतं की, मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे”.
आणखी वाचा – आर माधवन झाला मुंबईकर, ‘या’ ठिकाणी घेतलं नवीन आलिशान घर, एकूण किंमत आहे…
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “कितीतरी वेळा मला चुकीचे फोन येतात.त्या कार्यक्रमासाठी मला बोलावलेलंच नसतं. हे मी नव्या सोनालीला सांगून झालं आहे. कितीतरी वेळा मी तिला निरोप पाठवला होता. पण तिचंही बरोबर आहे. तिचं नावच ते आहे”. यापुढे त्यांनी आलिया व कियारा यांच्या नावांचं उदाहरण देत असं म्हटलं की, “कियारा आडवाणीचं नाव आधी आलिया होतं. पण या इंडस्ट्रीत आधीच एक आलिया होती. त्यामुळे तिने त्या मुलीची व स्वत:च्या नावाचं अस्तित्व राखण्यासाठी स्वत:चं नाव बदलून कियारा ठेवलं. त्यामुळे मी माझा दररोजचा त्रास पचवण्याचा प्रयत्न करते. पण मला याचा त्रास होतो की, मला अजूनही सांगावं लागतं आणि चुकीच्या फोनला उत्तर द्यावी लागतात”.
यापुढे त्यांनी स्वाभिमानाबद्दल असं म्हटलं की, “बोलण्यासारखं खूप आहे. पण मला वाटतं की, माझ्या नावाची थोडी तरी काळजी घेतली गेली असती तर मला बरं वाटलं असतं. वाईट याचं वाटतं की, नाव आणि आडनाव सारखंच आहे. मी ‘दोघी’ नावाचा चित्रपट केला होता. त्यानंतर ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट आला. आजही गुगलवर शोधलं तर ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट येतो किंवा सोनाली कुलकर्णी हे नाव टाकलं तरी वेगळे फोटो येतात आणि मला याचं वाईट वाटतं. मला प्रत्येक कलाकाराविषयी आदर आहे. पण मला माझ्याही कामाविषयी आदर आहे. त्यामुळे माझं नावही न दिसणं हे फार त्रासदायक आहे”.