‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र मध्यंतरीच्या काळात मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नव्हती. आता मालिकेने लीप घेतल्याने ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. सात वर्षांनी अखेर अर्जुन व अप्पी यांची भेट झाली असून अमोलही त्याच्या बाबांना भेटला आहे. सात वर्षांनी अमोलला त्याचा बाबा मिळाला आहे त्यामुळे तो भलताच खुश आहे. संयमी आणि नेहमीच समजून घेणारा अमोल हा साऱ्यांचा लाडका आहे. (Appi Amchi Collector Promo)
सध्या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलच्या आग्रहाखातर अप्पी व अर्जुन एकत्र आले आहेत. अमोल अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. नवनवीन शकला लढवून तो दोघांना एकत्र आणताना दिसत आहे. तर या सगळ्यात त्याचा मामा दीपेश त्याला मदत करत आहे. तर एकीकडे आर्या व रुपाली अमोलचा डाव हाणून पाडत अप्पी व अर्जुन दूर कसे राहतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकत्र राहत असले तरी ते दोघे मनाने एकमेकांपासून केव्हाच दूर गेले आहेत. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विसर अद्याप अर्जुनला पडलेला नाही. सात वर्षांपूर्वी अपर्णाने केलेली चूक त्याच्या मनात सात वर्ष सलत राहिली. त्यामुळे अप्पीला तो कधीही माफ करायला तयार नाही. इतकंच नव्हे तर अप्पीला अर्जुन पुन्हा आपल्याकडे यावा, सुखाचा संसार त्यांचा सुरु व्हावा असं त्यांना वाटत असतं. तर अमोलचे प्रयत्न अप्पीला दिसत असतात त्यामुळे ती अर्जुनला समजावते.
अप्पी अर्जुनला विचारते, “आपण अमोलसाठी एकत्र राहतोय तर आपल्यात पुढे काही होऊ शकनार नाही का?, अमोलला असं वाटत आहे की आपण प्रेमाने एकत्र राहावं”, यावर अर्जुन स्पष्ट बोलतो, “अप्पी तुला नेमकं काय बोलायचं आहे?, मी तुला स्पष्टच सांगतो, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत”. अर्जुनने अप्पीचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.