सध्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूर अभिनित या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. दरम्यान चित्रपटातील सगळ्यांच कलाकारांचं भरभरून कौतुक करण्यात आलं. या चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती डिमरीची भूमिका विशेष गाजली. या चित्रपटामुळे अभिनेत्रीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. (Trupti Dimri On Bhabhi 2)
‘अॅनिमल’ चित्रपटामुळे तृप्तीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘नॅशनल क्रश’ म्हणत अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा होत आहे. तर कोणी तिला ‘भाभी २’ या नावाने आवाज देत आहे. यावर आता तृप्तीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉलीवूड हंगामा’सह बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “सगळे मला भाभी २ म्हणत आहेत. मी विमानतळावर होते, तिथे चेकिंग करणाऱ्यानेही मला भाभी म्हटलं. मला या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद वाटत आहे. सगळीकडे उत्सवासारखं वातावरण आहे. लोक दोन-तीनदा चित्रपट पाहत आहेत. ते या चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात ठेवत आहेत. ही भावना खूप सुखावणारी आहे,” असं तृप्ती म्हणाली.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तृप्तीचे फॉलोअर्स एका आठवड्यात साडेसहा लाखांवरून तब्बल २.६ मिलियन झाले आहेत. याबद्दल तृप्ती म्हणाली, “माझ्यापेक्षा माझे कुटुंब उत्साही आहे. प्रत्येक वेळी थोडे फॉलोअर्स वाढले की ते मला सांगत असतात.” या चित्रपटानंतर चाहते तिचे ‘बुलबुल’ व ‘कला’ हे चित्रपटही पाहत आहेत, ही खूप चांगली गोष्ट असल्याचं तृप्तीने सांगितलं.
तृप्ती डिमरीने ‘अॅनिमल’ चित्रपटात झोया ही भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. याआधी तृप्तीने ‘बुलबुल’ व ‘कला’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटांपेक्षा तिला खरी ओळख ‘अॅनिमल’ या चित्रपटातील झोया या भूमिकेमुळे मिळाली.