मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या तीनही माध्यमांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत अमृताने स्वतःच स्थान निर्माण केलं. मराठी मनोरंजनविश्वात तर या अभिनेत्रीचा दबदबा आहेच याशिवाय हिंदी प्रेक्षकांमध्येही अमृताने स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलं. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘गली बॉय’ या चित्रपटातही अमृताने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय अभिनेत्री काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमुळे चर्चेत राहिली. (Amruta Subhash On Intimate Seen)
‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा सुरु होती. या वेबसीरिजमध्ये अमृताने दिलेल्या इंटिमेट सीनमुळे ती विशेष चर्चेत आली. अभिनेत्रीने अभिनेता श्रीकांत यादव यांच्यासह इंटिमेट सीन दिले होते. या सीनची झालेली चर्चा, त्यानंतर मिळालेली कौतुकाची थाप हे सारं असलं तरी हे सीन शूट करताना अभिनेत्रीची नेमकी काय परिस्थिती झाली होती याबाबत नुकतेच तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
अमृता सुभाष ‘नेटफ्लिक्सच्या राउंडटेबल’ मुलाखतीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी अमृताने इंटिमेट सीनबाबत भाष्य केलं. अभिनेत्री म्हणाली, “मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा इंटिमेट सीन वाचून मी खूप घाबरले होते. स्क्रिप्ट वाचल्यावर मी कोकोला म्हणजेच कोंकणा सेन शर्माला सांगितलं की, मला श्रीकांतशी बोलायला एक दिवस दे कारण, अनेक वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एवढंच नव्हे तर तो माझ्या नवऱ्याचा देखील खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे मला आधी त्याच्याशी बोलावं लागेल. त्यानंतर मी ज्यावेळी याबद्दल श्रीकांतशी बोलले तेव्हा तो अजिबात तयार नव्हता”.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, रुग्णालयात दाखल, आता कशी आहे प्रकृती?
यापुढे श्रीकांतची प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली, “तुझ्याबरोबर असे सीन मी करू शकत नाही, असं श्रीकांतचं ठामपणे म्हणणं होतं. पण, त्यावेळी माझा नवरा संदेश कुलकर्णी जो स्वत: एक उत्तम अभिनेता व श्रीकांतचा खूप चांगला मित्र आहे. त्याने आम्हा दोघांना समजावलं. तू एकदम उत्तम काम करशील असं माझ्या नवऱ्याने श्रीकांतला सांगितलं. त्यानंतर श्रीकांत हे सीन करण्यास तयार झाला. एकंदर सर्वांनी श्रीकांतच्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं”, असं अमृता सुभाषने सांगितलं.