amruta khanvilkar best actress : नुकताच ६० आणि ६१वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली. अशातच चंद्रमुखी या गाजलेल्या चित्रपटासाठी अभिनेत्री अमृता खानविलकरला ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रमुखी चित्रपटामुळे अमृताची लोकप्रियता वाढलेली दिसली. या चित्रपटाने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटातील चंद्रा हे गाणं विशेष गाजलं. चित्रपटातील अभिनयासाठी अमृताला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला पण हा पुरस्कार घेण्यासाठी अमृता भारतात नसल्याने पोहचू शकली नाही. अमृता सध्या परदेशात आहे, आणि तिने परदेशातून हा आनंद शेअर केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अमृता म्हणाली, “६० आणि ६१वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला आणि त्यात मला ‘चंद्रमुखी’साठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर खूप मोठी जबाबदारी आहे. हा पुरस्कार मिळाला, हे अजूनही खरं वाटत नाही पण आज महाराष्ट्र शासनाने, माझ्या राज्याने, मला असा मान दिला याचा मनापासून अभिमान वाटतोय. या पुरस्कारासाठी संपूर्ण चंद्रमुखी टीमचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, स्पॉट बॉय ते मेकअप आर्टिस्ट सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही घेतलेली मेहनत, दिलेलं प्रेम, हेच आज या पुरस्काराच्या रुपाने फळाला आलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांचेही विशेष आभार. कलाकारांवर विश्वास ठेवून, आमच्या कामाचं असे मनापासून कौतुक केल्याबद्दल”.
पुढे तिने लिहिलं, “आज चंद्रमुखीच्या रुपाने प्रेक्षकांनी मला ज्या प्रकारे स्वीकारलं, त्या प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक भेटलेला प्रेक्षक, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम, सगळं आठवतंय. जर मला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळालेली असेल, तर ती माझ्या महाराष्ट्रामुळे. हा माझा पहिलाच राज्य पुरस्कार आहे आणि म्हणूनच तो अधिक खास आहे. कायमच लक्षात राहणारा. त्याचबरोबर एक गोष्ट ठामपणे मनात आहे की, हा पुरस्कार म्हणजे थांबण्याची वेळ नाही, तर अजून चांगलं, दर्जेदार आणि मनापासून काम करत राहण्याची नवी प्रेरणा आहे”.
आणखी वाचा – कॅमेरा बंद असताना फराह खान कशी वागते?, कुक दिलीपनेच केला खुलासा, म्हणाला, “खूप वाईट…”
तिने पोस्टच्या शेवटी असेही म्हटले की, “आता यानंतर केवळ चांगल्या लोकांबरोबर काम करत राहायचं, सुंदर कथा सांगायच्या, आणि आपल्या प्रेक्षकांच्या हृदयात पुन्हा एकदा घर करायचं. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या सर्व ज्युरी सदस्यांचे आणि संपूर्ण टीमचेही खूप खूप आभार. हा अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी कायम ऋणी आहे. मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र”.





