अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ : द रुल’चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झाले आहेत आणि या चारच दिवसात चित्रपटाने आपलं बजेट वसूल केलं आहे. प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे. तेलुगू असो किंवा हिंदी दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी तितकीच गर्दी होत आहे. अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २०२१ साली ‘पुष्पाःद राइज’ आला होता. तर आता त्याचा सीक्वेल आला आहे आणि याला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. (pushpa 2 movie box office collection)
या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ‘पुष्पा २’ने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आणि हा चित्रपट सर्वात मोठी ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी कमी झाली आणि चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ९३.८ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी वीकेंड जवळ येताच चित्रपटाने कमाईत वाढ दाखवली आणि पुन्हा १०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी १४१.५ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह चित्रपटाने आतापर्यंत एकूण ५२९.४५ कोटी रुपयांची कमाई केली.
‘पुष्पा २’ने बॉलिवूड, हॉलिवूड आणि दक्षिणेतील ‘जेलर’, ‘लिओ’ आणि ‘पीके’ या चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले. याशिवाय ‘एव्हेंजर्स एंड गेम’च्या कमाईचाही रेकॉर्ड मोडला. तसंच भारतातील ‘दंगल’ या चित्रपटाच्या आजीवन कलेक्शनलादेखील (३८७.३८कोटी) मागे टाकले. या चित्रपटाने केवळ वर उल्लेख केलेल्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डच तोडले नाही तर ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चे (३९१.०४) कोटी रुपयांचे रेकॉर्डदेखील तोडले. तसंच ‘सालार’चा पहिला भाग, ‘रोबोट’चा दुसरा भाग आणि बाहुबली (४२१ कोटी रुपये) या चित्रपटांच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे.
आणखी वाचा – भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीची गौतम बुद्धांच्या प्रवासाशी तुलना, म्हणाली, “माझ्या आध्यात्मिक मार्गावर…”
दरम्यान,‘पुष्पा २’ हा दिग्दर्शक सुकुमार यांच्याच ‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे, जो २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भागही जाहीर झाला आहे. तिसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा ३ द रॅम्पेज’ असणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत.