आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात लायब्रेरियन दुबे ही भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचा ६८ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मीरारोडमधील घरात काही कामानिमित्त ते टेबलवर चढले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. अखेरीस काही तासांमध्येच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. (Akhil Mishra’s wife share emotional post)
अखिल यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं पण ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली लायब्रेरियनची भूमिका विशेष गाजली. त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा मिळवली. अखिल यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना बरंच दुःख झालं आहे. त्यांची पत्नी सुजैन बर्नर्ट पुर्णपणे खचून गेली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
सुजैनने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या फोटोत ते दोघं एकमेकांसह बोलण्यात व्यघ्र दिसत आहेत. सुजैनने हिरव्या रंगाचा ड्रेस तर अखिल यांनी गुलाबी व सफेद रंगाचा कुर्ता घातला आहे. हा फोटो शेअर करत सुजैनने एक भावनिक पोस्ट लिहीली आहे. त्यात ती लिहीते, “हे आम्ही होतो, नेहमी एकमेकांत गुंतलेले, बोलत, कित्येकदा फक्त एका नजरेने…तू नेहमी माझा होतास आणि मी तुझी. तुझ्या प्रेमात मी भारावून गेली आहे. माझी इच्छा आहे की तुझे प्रेम तुझा आत्मा जिथे जात आहे तिथे तू घेऊन जावंस… अगदी लाटेसारखे…”, असं लिहीत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”
पुढे ती लिहीते, “मी या पोस्टमधून सगळ्यांचे धन्यवाद मानू इच्छिते. मला आशा आहे की तुम्ही सगळे मला समजून घ्याल. मी सगळ्यांच्या कमेंटवर रिप्लाय देऊ शकत नाही. पण विश्वास ठेवा मी तुम्हा सगळ्यांचे कमेंट वाचत आहे. तुमचं प्रेम व पाठिंबा माझ्यापर्यंत नेहमी पोहोचत आहे”. अखिल यांनी ३ फेब्रुवारीला २००९ मध्ये जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्टसह लग्न केलं. पुन्हा त्यांनी ३० सप्टेंबर २०११ मध्ये सुजैनसह पारंपारीक पद्धतीने विवाहगाठ बांधली होती.