छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या मालिकांच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी घराघरांत पोहोचतात. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकेबद्दल व त्या मालिकेच्या कलाकारांबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते मंडळी कायमच उत्सुक असतात. अशीच छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका. मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात.
अशातच मालिकेतील रुपाली म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ऐश्वर्या यांनी मालिकेतील नुकत्याच शूट झालेल्या एका सीनच्या चित्रीकरणाच्या तयारीचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. मालिकेत नुकताच रुपाली दक्षिण दिशेला जातानाचे दाखवण्यात आले. यावेळी हा सीन कशा पद्धतीने शूट झाला. यावेळी काय मेहनत घेण्यात आली होती, त्याबद्दलचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील पडद्यामागचे कलाकारांनी या सीनसाठी घेतलेली मेहनतही दिसून येत आहे.
आणखी वाचा – “शेवंताबाई शेवंताताई झाली”, अपूर्वा नेमळेकरने घटवलं इतकं वजन, जिममधील फोटो शेअर केल्यानंतर चाहतेही चक्रावले
“उन्हाळ्याच्या दिवसात आउटडोअर शूट हे खूपच कठीण काम असते’ असं म्हणत ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये ऐश्वर्या पाण्यात उतरलेल्या दिसत आहेत, तर कडक उन्हात कातळावर उभ्या राहिलेल्याही दिसत आहेत. तसेच मोठा वारा येत असताना त्यांनी शूट केलेला एक व्हिडीओही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या अनेकदा मालिकेचे पडद्यामागील काही खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर करत असतात.
अशातच त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. खूपच छान मालिका आहे, मालिकेच्या एका सीनसाठी किती मेहनत घेतली जाते हे यातून दिसून येत आहे” अशा अनेक कमेंट्स करत त्यांचे या सीनसाठी कौतुक केले आहे.