क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाची बातमीही सोशल मीडियावर पसरली होती पण दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य केले नाही. अनेक वेळा त्यांच्यात काहीतरी बरोबर नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण सर्व अफवांना आणि चर्चेला पूर्णविराम देत अखेर हार्दिक पांड्या व नताशा स्टॅनकोविक यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर घटस्फोटाची घोषणा केली आहे. (Natasa Stankovic Net Worth)
हार्दिक व नताशा यांनी सांगितले की, ते परस्पर संमतीने वेगळे होत आहेत आणि दोघे मिळून मुलाचे संगोपन करतील. यापूर्वी नताशाने एक फोटो शेअर केला होता ज्यात ती तिच्या मूळ गावी सर्बियाला पोहोचली आहे आणि तिचा मुलगा तिच्याबरोबर आहे. आता घटस्फोटानंतर नताशाच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे आणि तिच्याकडे किती मालमत्ता आहे हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. नताशा केवळ भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नाही तर ती एक मॉडेल, अभिनेत्री व उत्तम डान्सर देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये इतकी आहे आणि नताशा स्टॅनकोविकची एकूण संपत्ती त्यापेक्षा कमी आहे.
‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, नताशा स्टॅनकोविकची संपत्ती २० कोटी रुपये आहे जी हार्दिकपेक्षा खूपच कमी होती. घटस्फोटानंतर हार्दिक नताशाला चांगली रक्कम देऊ शकतो आणि त्यानंतर नताशाच्या संपत्तीत वाढ होऊ शकते, असेही रिपोर्ट्समध्ये बोलले जात आहे. मात्र, या गोष्टींची अद्याप पुष्टी झालेली नाही. नताशा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणूनही कमावते, याशिवाय ती नृत्य, अभिनय व मॉडेलिंगदेखील करते. ती सर्बियामध्ये राहूनही हा व्यवसाय सुरु ठेवू शकते.
४ मार्च १९९२ रोजी सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशाने वयाच्या १७व्या वर्षी नृत्य शिकले आणि तेव्हापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. नताशाने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ (२०१३) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर नताशा २०१४ साली ‘बिग बॉस ८’ मध्येही दिसली होती आणि तिने ‘नच बलिए ९’ मध्येही सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये नताशा बादशाहच्या ‘डीजे वाले बाबू’ या सुपरहिट गाण्यात अभिनेत्री म्हणूनही दिसली होती. यानंतर नताशाने ‘फुक्रे रिटर्न्स’ आणि ‘झिरो’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे. नताशाने भारतात राहून खूप काम केले आहे पण आता ती सर्बियाला गेली आहे. सध्या ती तिथेच राहून आपला मुलगा अगस्त्यला मोठं करणार आहे.