Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या आठव्या आठवड्यात झालेल्या धक्कादायक एलिमिनेशनने साऱ्यांचीच झोप उडविली. वैद्यकीय कारणामुळे सुरुवातीला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेने घरातून एक्झिट घेतली तर त्यानंतर नॉमिनेशन प्रक्रियेत ‘बिग बॉस’ यांनी काही स्पर्धकांना सेफ करत एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यास सांगितले आणि तो स्पर्धक म्हणजेच अरबाज पटेल. वोटिंग पोलवर कमी मतं पडल्यामुळे अरबाज पटेलचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला असल्याचे समोर आलं. उत्तम खेळ खेळत, उत्तम गेम प्लॅनिंग करत इतकंच नव्हे तर रागावर ताबाही ठेवत अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःच असं स्थान निर्माण केलं.
सर्व स्पर्धकांशी अरबाज बोलून चालून होता मात्र निक्की बरोबर त्याचं खास नातं असल्याचं पाहायला मिळालं. अगदीच ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याच्या दिवसापासून ते एक्झिट घेण्यापर्यंत अरबाजने निक्कीची साथ बिलकुल सोडली नाही. निक्की अरबाजमध्ये बरेचदा वादही झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी ही जोडी फुटते की काय आणि दोघं वेगळे होणार की काय असे चित्र दिसत असताना दोघे समजुतीने पुन्हा एकत्र आल्याचं दिसलं. यामुळे टीम ए मध्ये फूट पडताना दिसली. निक्कीच्या वागणुकीला अरबाज पाठीशी घालतोय हे पाहून टीम एने अरबाज व निक्कीची साथ सोडली आणि ते स्वतंत्र खेळू लागले. ‘बिग बॉस’च्या घरातून आता अरबाजने एक्झिट घेतल्यानंतर त्याची ही एक्झिट अनेकांना अमान्य असल्याचे म्हटले आहे.
वोट कमी मिळण हा योग्य निर्णय नाही तर त्याचा गेम बघून वोट करायला हव होतं असं अनेकांनी म्हणत अरबाजला पाठिंबा दर्शवलेला पाहायला मिळत आहे. अरबाज घरात उत्तमच खेळ खेळत होता मात्र निक्कीमुळे काहीसं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचाच बदलला हे स्वीकारणं तितकंच गरजेचं आहे. अरबाजच्या एलिमिनेशनच्या पोस्टवर आलेल्या नेटकऱ्यांच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “अरबाज एक मजबूत खेळाडू होता. त्याने निक्कीसाठी खेळण्याऐवजी स्वतःसाठी खेळायला हवे होते. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा”, अशी कमेंट अभिनेता पुष्कर जोगने केली आहे.
आणखी वाचा – योगिता चव्हाणच्या नवऱ्याने केली निक्कीची नक्कल, कशी रडली तेही दाखवलं, म्हणाला, “तू पण घराबाहेर जा आणि…”
तर “मुर्ख लोक आहेत. एवढा चांगला खेळला तो की प्रत्येक टास्कमध्ये जिंकला. त्याच्यासारखं कोणीच नाही खेळलं. निक्की अरबाज असल्यामुळे आम्ही शो पाहत होतो. आता काही मजा नाही शो बघायची”, “स्पष्टपणे सांगायचे तर तो एक चांगला खेळाडू आहे आणि तो खूप चांगला खेळला. फक्त एक चुक झाली ती म्हणजे निवड. निक्कीची साथ देण्यापेक्षा तो स्वतः खेळायला हवा होता”, “जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही त्याला एक मजबूत स्पर्धक म्हणून पाहत होतो. अरबाज आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे”, “एक खेळाडू म्हणून अरबाजची तुलना कोणाशी होणार नाही”, “खूप चुकीचा निर्णय झाला. टॉप ५ मध्ये होता अरबाज”, अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी अरबाजला पाठिंबा दर्शविला आहे.