Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत जीवन संपवलं. ते ५८वर्षांचे होते. नितीन देसाई यांच्या आत्महत्ये मागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे. तर कलाकार मंडळीही दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया दिली आहे. (Nitin Desai Suicide)
नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी कळताच कलाविश्वामध्ये एकच खळबळ उडाली. ‘एबीपी माझा’शी बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी नितीन देसाई यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. शिवाय अमोल कोल्हे यांना मोठा धक्का बसला आहे. ते म्हणाले, “हे वृत्त खरंच खूप धक्कादायक आहे. खूप वर्ष आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पहिलं मालिका पूर्ण करण्याचं शिवधनुष्य नितीन देसाई दादांनी पेललं”.
पाहा नितीन देसाई यांच्या निधनानंतर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया (Nitin Desai Suicide)

“लढाऊ वृत्ती असलेल्या व्यक्तीबाबत अशी बातमी ऐकायला मिळणं ही खूप धक्कादायक बाब आहे. त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. किंबहुना बॉलिवूडमध्ये मराठी माणसाची मान नितीन देसाई यांनी उंचावली. एन.डी. स्टुडिओसारखं भव्यदिव्य स्वप्न त्यांनी पाहिलं. जवळपास सहा ते सात वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये आमचा फारसा संपर्क आला नाही. चार-पाचवेळा फोनवर बोलणं झालं. दादांबाबत अशी बातमी ऐकायला मिळते यावर विश्वासच बसत नाही”.
मनसे नेते व दिग्दर्शक अभिजीत पानसे, आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांनीही नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर दुःख व्यक्त केलं आहे. मराठीसह बॉलिवूड चित्रपटांसाठीही नितीन देसाई यांनी उल्लेखनीय काम केलं. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, यांसारख्या अनेक चित्रपटांचं कला दिग्दर्शन त्यांनी केलं. एन.डी. स्टुडिओ उभारण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं.