Vidya Balan Dance Video : कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटामधील ‘आमी जे तोमर 3.0’ या गाण्याचे नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले आहे. या खास प्रसंगी विद्या बालन व माधुरी दीक्षित यांनीही या गाण्यावर लाईव्ह परफॉर्म केलं. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या गाण्यावर परफॉर्म करताना विद्या बालनबरोबर एक मोठी घटना घडली ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं. नाचताना अभिनेत्रीचा पाय तिच्या साडीत अडकला आणि ती स्टेजवर पडली. मात्र, पुढच्याच क्षणी तिने स्वत:वर इतक्या सुंदरपणे ताबा मिळवला की कदाचित प्रेक्षकांना वाटेल की, ही तिच्या डान्सची एक स्टेप असावी. मात्र, स्टेजवर काय चूक झाली हे विद्यानेच नंतर सांगितले.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘भूल भुलैया ३’ या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबई येथे या चित्रपटाच्या ‘आमी जे तोमर 3.0’ या लेटेस्ट गाण्याचा प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. माधुरीबरोबर परफॉर्म करताना विद्या स्टेजवर पडली आणि जमिनीवर बसली. मात्र, तिने लगेचच हा क्षण सुंदरपणे हाताळला.
मात्र, या परफॉर्मन्सनंतर विद्या म्हणाली की, माधुरी दीक्षितबरोबर स्क्रीन शेअर करणे हा तिच्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. ती म्हणाली, “त्याच फ्रेममध्ये राहून त्यांच्याबरोबर हँग आउट करणं खूप मोठी गोष्ट. आज माझी बहिण मला म्हणाली, तुला त्यांच्यासारखं व्हायचं होतं आणि आज तू त्यांच्याबरोबर नाचत आहेस, ही खूप मोठी गोष्ट नाही का? होय, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, मी कृतज्ञ आहे. मला खूप मजा आली. आजही बघा, मी पडले पण नंतर त्यांच्या भरोशावर उठून मी पुन्हा परफॉर्म करु लागले”.
लोकांनी विद्याचे खूप कौतुक केले आहे आणि पडल्यानंतर तिने स्वतःला ज्या सौंदर्याने हाताळले आहे ते पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत. तर काहीजण हे ओव्हरॲक्ट झाल्याचे सांगत अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसले. विद्या बालन व माधुरी दीक्षितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.