स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली. मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना आणि टीआरपीमध्येही मालिका हिट होत असताना तेजश्रीने अचानक मालिका का सोडली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यानंतर आता अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही मुक्ताची भूमिका साकारणार आहे आणि तिने मालिकेच्या शुटींगला सुरुवातही केली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये आता तेजश्री ऐवजी स्वरदा ठिगळे नवीन मुक्ता साकारणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये साहजिकच नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अनेकांना नवीन मुक्ताच्या भूमिकेत स्वरदाला पाहणे कठीण जात आहे. त्यामुळे चाहते याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (swarda thigale first reaction)
अशातच आता या सर्वांवर स्वरदाने तिची भूमिका व्यक्त केली आहे. इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत स्वरदाने याविषयी भाष्य केलं आहे. याबद्दल स्वरदा असं म्हणाली की, “स्टार प्रवाहबरोबर जोडले जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे. नवीन वर्ष आहे आणि नवीन काम मिळालं आहे. त्याबद्दल मी आनंदी आहे. ही भूमिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण याआधी मी कधी एका आईची भूमिका केली नाही. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनिमित्त मला ती भूमिका करायला मिळत आहे. त्यामुळे ही भूमिका नक्कीच जबाबदारीची आहे”.
आणखी वाचा – मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, मोठी स्टारकास्ट पडद्यावर झळकणार
यापुढे तिने असं म्हटलं की, “मुक्ताच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. कारण सागर-मुक्ता यांचे नाते, मुक्ता आणि तिच्या सासूचे नाते किंवा नणंद, दीर यांच्यासही वेगळं नातं आहे आणि सई… तिच्याबरोबर मुक्ता म्हणून माझे वेगळे नाते आता सुरु होत आहे. कारण ती मुळातच गोड मुलगी आहे, तिच्याशी आता गट्टी जमत आहे. त्यामुळे लवकरच ते सीनमधून दिसेल. तिच्याबरोबर स्वरदा म्हणून माझा आता बॉण्ड तयार होत आहे. मालिकेच्या सेटवर येऊन मला तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे आता मी या भूमिकेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे”.
यापुढे स्वरदाने असं म्हटलं की, “मला या सर्व पद्धतीची मज्जा येत आहे. मला माझ्याबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. आईची भूमिका साकारताना मातृत्व असतं ते आपल्यात असतं तर तो भूमिकेमधून आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या सर्व पद्धतीचा सध्या मी आनंद घेत आहे”. दरम्यान, आता स्वरदा तेजश्रीची जागा घेऊन तिच्यासारखंच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार का? यामध्ये तिला कितपत यश मिळेल? हे आगामी दिवसांत पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.