अभिनेत्री स्पृहा जोशी हिने आजवर तिच्या अभिनयाने चाहत्यांची मन जिंकली आहेत. सुशील, सुंदर, सोज्वळ अशी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीकडे आवर्जून पाहिलं जातं. आजवर स्पृहाने तिच्या अभिनयाने मालिकाविश्वात तसेच चित्रपट व नाटकांमधून छाप पाडली. अभिनेत्रीसह स्पृहा उत्तम कवियित्री देखील आहे. स्पृहाने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही स्पृहा नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून काही ना काही खास शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Spruha Joshi On Audition)
अशातच नुकतीच स्पृहाने ‘आरपार ऑनलाईन’ चॅनलच्या ‘वुमन की बात’ या सेशनमध्ये सहभाग दर्शविला. यावेळी बोलताना स्पृहाने अनेक विविध गोष्टींवर गप्पा मारल्या. दरम्यान अभिनेत्रीने तिला ऑडिशनच्या वाटणाऱ्या भीतीबद्दल भाष्य केलं. याबद्दल सांगताना स्पृहा म्हणाली, “सुरुवातीच्या काळात ऑडिशनदरम्यान माझी चिडचिड व्हायची. माझ्या मनात यायचं, हा सहायक दिग्दर्शक मला काम येतं की नाही हे का सांगतो? पण, मुद्दा काम येतं की नाही हा नव्हताच. त्यावेळी माहितीच नसतं तू या लूकमध्ये कशी दिसत आहेस? भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही? या गोष्टी समजून घ्यायला मला काहीसा वेळ लागला”.
यापुढे ऑडिशनबाबत बोलताना स्पृहा म्हणाली, “पूर्वी मला ऑडिशन्सची खूप भीती वाटायची. आतापर्यंत ही गोष्ट मी फारशी कोणाला सांगितलेली नाही. सुरुवातीच्या काळात ऑडिशनला जायचं असेल तेव्हा मी घराबाहेर पडायचे. पुढे, काही वेळाने त्या संबंधित कास्टिंग दिग्दर्शकाला फोन करुन आज वैयक्तिक कामामुळे मला ऑडिशनला येता येणार नसल्याचं मी बरेचदा सांगितलेलं आहे”.
ऑडिशनला नकार दिल्यानंतर घडलेला एक किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाली,”मला यायला जमणार नाही असं मी दोन-तीन वेळा सांगितलं. पराग मेहता नावाचा एक कास्टिंग दिग्दर्शक आहे. अनेक उत्तम प्रोजेक्टसाठी कास्टिंग केलं आहे. परागने मला फोन करुन तू मला ऑफिसला भेटायला ये असं सांगितलं. ज्यावेळी मी त्याला भेटले तेव्हा तो मला म्हणाला, आज तुला जाणूनबुजून न सांगता मी ऑडिशनला बोलावून घेतलं. कारण, ऑडिशनला ये सांगितलं असतं, तर तू आली नसतीस आणि मी माझ्या सहकाऱ्याला देखील सांगून ठेवलं होतं की, ही आज नाही आली, तर यापुढे पुन्हा कधीच हिला फोन करायचा नाही. इंडस्ट्रीत खूप काम केल्यामुळे ऑडिशन देणार नाही असा माझा मुद्दाच नव्हता. मला खरंच खूप ऑडिशनची भीती वाटायची. यातून स्वत:ला बाहेर काढायला मला खूप वेळ लागला” असं ती म्हणाली.