अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सोशल मीडियावरही मृण्मयी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विशेषतः मृण्मयीचे तिच्या बहिणीबरोबरचे म्हणजेच गौतमीबरोबरचे बॉण्डिंग प्रेक्षकांना भावतं. देशपांडे सिस्टर्सची धमाल मस्ती नेहमीच चाहते एन्जॉय करतात. काही दिवसांपूर्वी गौतमीचा लग्नसोहळा पार पडला. तिच्या लग्नातही मृण्मयीने मजा केलेली पाहायला मिळाली. (Mrunmayee Deshpande Farm)
मृण्मयी बहिणीबरोबच्या गमतीशीर व्हिडीओसह तिच्या फार्महाऊसमधीलही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्निल राव या दोघांनी मिळून महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात एक छोटसं घर बांधलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या ‘ड्रीम होम’चा फोटोही शेअर केला होता.त्यानंतर दोघांनी त्यांच्या या फार्महाऊसवर शेती करण्यास सुरुवात केली. स्वत:साठी लागणाऱ्या भाज्या-फळभाज्यांचे उत्पादन याठिकाणी ते घेतात.
मृण्मयी व स्वप्निल यांनी शेतीविषयक माहिती देतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. मोकळी हवा, स्वत:साठी स्वत:च उगवलेलं अन्न, शहराबाहेरील शांतता आणि साधं राहणीमान या साऱ्याचा आनंद सध्या मृण्मयी घेताना दिसत आहे. नुकताच मृण्मयीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या शेतातील भाज्या तोडताना दिसत आहे. मृण्मयीने फळभाजीची शेती केली आहे.
“स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी माझ्या शेतातून काही ताज्या भाज्यांची कापणी केली! तुमचे अन्न नेमके कुठून येते हे जाणून घेण्यापेक्षा चांगले काहीच नाही” असं कॅप्शन देत तिने वांगी कापणी करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतःच्या शेतातून उगवलेले पीक ते रोजच्या जेवणासाठी वापरतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने स्ट्रॉबेरी या फळाचीही लागवड केल्याचं सांगितलं होत. याशिवाय मृण्मयी व स्वप्निल यांनी काही दिवसांपूर्वी हँडमेड व ऑरगॅनिक साबणांचा व्यवसाय सुरु केला होता.