gayatri datar wedding : सध्या मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री गायत्री दातारच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरु आहे. लवकरच विवाहबंधनात अडकणाऱ्या गायत्रीसाठी तिचे व्यावसायिक कुटुंबीय अर्थात ‘सिरियल किलर’ या नाटकाच्या संपूर्ण टीमने अत्यंत प्रेमाने एका खास ‘केळवण’ समारंभाचे आयोजन केले होते. गायत्री दातार आणि ‘सिरियल किलर’ नाटकाच्या टीमचे नाते केवळ सहकाऱ्यांचे नसून एका कुटुंबासारखे आहे. आयुष्यात अशी काही मोजकीच माणसं असतात, जी अगदी कमी वेळात आपलीशी वाटू लागतात, अशा भावना गायत्रीने व्यक्त केल्या. या खास प्रसंगी नाटकाचे निर्माते प्रणय तेली आणि दिग्दर्शक केदार देसाई यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन हे केळवण आयोजित केले होते.
या आनंददायी सोहळ्याला अभिनेता भाऊ कदम, अभिनेत्री गौरी, तेजस यांच्यासह नाटकाच्या संपूर्ण टीमने उपस्थिती लावली होती. खवय्येगिरी आणि गप्पांची मैफल अशा वातावरणात रंगलेल्या या केळवणाने गायत्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. इतकंच नाहीतर गायत्रीने या खास केळवणाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात अगदी साग्रसंगीत केळवणाचा बेत केल्याचं दिसत आहे. एंट्रीलाच गायत्री नाचताना दिसत आहे आणि खूप खुश दिसत आहे. ओटी भरून तिचं सगळ्यांनी औक्षण केलं. यानंतर मोदक आणि तूप पुरणपोळी असा गोडाचा बेत केळवणाला होता.
A post shared by Gaytri Pradip Datar (@gayatridatarofficial)
“काही माणसं आयुष्यात खूप कमी वेळात आपलीशी वाटू लागतात. ‘सिरियल किलर’चे आमचे निर्माते, दिग्दर्शक, भाऊ कदम, गौरी, तेजस आणि संपूर्ण टीम अगदी तशीच आहे. माझ्यासाठी इतकं अप्रतिम ‘केळवण’ आयोजित केल्याबद्दल प्रणय तेली सर आणि त्यांचे कुटुंब, तसेच केदार देसाई सर आणि त्यांच्या कुटुंबाचे मनापासून आभार”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – मुस्लिम असणाऱ्या जरीन खानवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का?, सततच्या चर्चांवर लेकाने सोडलं मौन, म्हणाला…
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गायत्री दातारने थेट साखरपुड्याचे फोटो शेअर एंगेज असल्याचं घोषित केलं. गायत्रीने फक्त साखरपुड्याची अंगठी दाखवत साखरपुडा झाल्याचं सांगितलं. दरम्यान आता अभिनेत्रीच्या लग्नाची सुपारी फुटली असून याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर आता गायत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. अद्याप अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.





