Bhakti ratnparkhi mother death : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली. पुष्कर श्रोत्री यांच्या वडिलांनी वृद्धापकाळाने वयाच्या ८९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृत्तपत्र क्षेत्रात, तसेच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात ते गेली ६५ वर्ष सक्रिय होते. यानंतर आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आईच्या निधनाची बातमी सोशल मिडीया पोस्टद्वारे दिली आहे. अभिनेत्रीने आईच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री भक्ती रत्नपारखीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे आईचे निधन झाल्याची बातमी दिली. ही पोस्ट शेअर करत भक्ती भावुक झाली आणि तिने या पोस्टमध्ये लिहिलं, “आई तु माझ्या सोबत आहेस. तुझा हा हसरा चेहराच सगळ्यांच्या लक्षात राहील. २२ फेब्रुवारी २०२६ ला आईला देवाज्ञा झाली. तिचं आवडीचं स्वयंपाकाचं काम करत असताना घरी आलेल्या पाहुण्यांच स्वागत करुन, हसत हसत कोणाला कसलाही त्रास न देता अचानक गेली. मला अजूनही खरं वाटत नाही आहे. माझे आई-बाबा दोघेही असेच गेले. अचानक खूप वाईट वाटत आहे, पण ते दोघंही माझ्याबरोबर आहेत”.
भक्तीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे सांत्वन केले आहे. आजवर भक्तीने मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावरही भक्ती बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच भक्तीने आई गेल्याची दुःखद बातमीही इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली.





