नुकताच व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत अनेकांनी त्यांच्या खास व्यक्तीसह हा प्रेमाचा दिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त बरंच बोललं जात असताना एका कलाकार जोडीबद्दल न बोलणं ठीक दिसणार नाही. मराठी सिनेसृष्टीतील कायमच रोमँटिक अंदाज देत फोटो, व्हिडीओ पोस्ट करत प्रेक्षकांची लाडकी असलेली जोडी म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अभिनयासह सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करत आली आहे. (Aishwarya Narkar And Avinash Narkar)
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर हे दोघेही सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ऐश्वर्या व अविनाश यांनी आपापल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. शिवाय सोशल मीडियावरही दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असतात. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या लाडक्या जोडीचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त या लाडक्या जोडीने सोशल मीडियावरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिमाचल प्रदेश येथे फिरतानाचे खास फोटो या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. दोघांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. शिवाय ते ही ट्रिप एन्जॉय करत असल्याचंही दिसलं. या व्हिडीओला अविनाश यांनी कॅप्शन देत असं म्हटलं की, “ज्या दिवसापासून आम्ही भेटलो त्या दिवसापासून मला हसवल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे माय लव्ह”, असं म्हणत त्यांनी ऐश्वर्या यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश व ऐश्वर्या यांच्या या रोमँटिक व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत दोघांचं कौतुक केलेलंही पाहायला मिळत आहे. एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत, “प्रेम काय आहे हे तुमच्याकडे पाहून समजतं. आजकाल लोक खूप दिखावेगिरी करण्याला जास्त महत्व देतात पण नात्यातला खरेपणा पाहायला मिळत नाही”, असं त्याने म्हटलं आहे. याशिवाय “असेच आनंदात राहा”, “ब्युटीफुल जोडी”, अशा अनेक कमेंटही आलेल्या पाहायला मिळत आहेत.