हिंदी चित्रपटसृष्टीतील विंदू दारा सिंग हा त्याच्या चित्रपटातील विविध भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडे त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत. विंदूने १९९६ सलाई अभिनेत्री तब्बूची बहीण फराह नाजबरोबर लग्न केले. पण काही कालावधीतच दोघांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. दोघांनाही एक मुलगा आहे. विंदूने लग्नाच्या वेळचा एक किस्सा शेअर केला आहे. फराहबरोबर लग्न करण्याआधी त्याचे वडील म्हणजे अभिनेते दारा सिंग यांनी इशारा दिला होता. (Vindu Dara Singh wife)
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, “माझ्या वडिलांनी फराहबरोबर लग्न करण्याआधी विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की दोन वेगवेगळ्या धर्मांमध्ये लग्न झाले आणि एखादा जास्त धार्मिक झाला तर संसारातील काही गोष्टी बिघडतात. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या धर्मामध्ये लग्न करण्याआधी विचार करण्याचा सल्ला दिला”.
पुढे तो म्हणाला की, “त्यांच्या या सल्ल्याचा खूप विचार केला. पूर्ण विचार करूनच मी फराहबरोबर लग्न करण्याचा विचार केला. पण लग्नाआधी फराह धर्माचा कधीही जास्त विचार करत नव्हती. कधी कधी कुटुंबापासून लपून सिगरेटही पित असत. तिच्या कुटुंबातील कोणीही सिगरेट पित नव्हते”. त्यानंतर त्याने सांगितले की, “आधी तर तिला धर्माबद्दल काही वाटायचे नाही. पण ती जेव्हा धार्मिक यात्रा करण्यासाठी मक्का मदीना येथे जाऊन आली तेव्हा ती बदलली होती. ती अधिक धार्मिक झाली होती. त्यानंतर आमच्यामध्ये सर्व बिघडू लागले आणि अशी वेळ आली की आम्ही वेगळे झालो”.
विंदू व फराह यांना फतेह नावाचा मुलगा आहे. फराहने विंदूला जवळपास सहा वर्ष भेटू दिलं नव्हतं. पण ती एक आई म्हणून खूप चांगली आहे. फराहपासून वेगळा झाला असला तरीही दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. फराहबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर विंदूने दिना उमरावबरोबर लग्न केले असून त्यांना एक मुलगी आहे.