काही कलाकार भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात. कोणतीही व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारण्यात माहिर असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत शशांक शेंडे. शशांक शेंडे यांनी कागर, रेडू, मस्का, बिस्किट, ख्वाडा, सोयरीक, बापल्योक अशा अनेक मराठी व तान्हाजी, चिल्लर पार्टी, सक्ती अशा अनेक हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आजवर साकारलेल्या आपल्या सर्वच चित्रपटांत व भूमिकांमध्ये शशांक यांनी जीव ओतला आहे.
शशांक शेंडे हे अभिनयात जितके माहीत आहेत. तितकेच किंबहूना त्याहूनही अधिक रित्या त्यांची संवादशैली प्रभावी आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. ‘इट्स मज्जा’बरोबर नुकत्याच साधलेल्या संवादात याचा प्रत्यय आला. शशांक शेंडे यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाबद्दल मनमुराद संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल काही खुलासेदेखील केले.
शशांक शेंडे संवादादरम्यान असे म्हटले की, “मुळात मला या क्षेत्रामध्ये यायचंच नव्हतं. मला काय व्हायचं आहे हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही. माझ्यासमोर जे येत गेलं ते मी करत गेलो. मी ठरवून काहीच केलं नाही. पुण्यामध्ये मी शाळेत होतो. मी महाविद्यालयामध्ये असताना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. तिथेही प्रवेश का घेतला? हे मला कळत नव्हतं. माझ्या घरातील सगळीच मंडळी उच्चशिक्षित आहेत. मीच फक्त या सगळ्यांमध्ये अशिक्षित होतो. विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा म्हणून मी अहमदनगरला गेलो होतो. त्यादरम्यान कोणाचा वचक नसताना त्या वयामध्ये ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या गोष्टी होऊन जातात. यादरम्यान तुमच्या समोर खूप सारी आमिष असतात. संगत वाईट आहे असं मी म्हणणार नाही. कारण आपणही वाईटच असतो. मला माझ्यासारखेच मित्र यादरम्यानच्या काळामध्ये मिळत गेले. मग माझं शिक्षणावरुन दुर्लक्ष झालं. ते अगदीच स्वाभाविक होतं. घरातील व्यक्तीने जर सांगितलं पुढे खड्डा आहे उडी मारु नको तर मी तिथेच उडी मारतो. तुम्ही स्वतः आई किंवा बाप झाल्यानंतर हे सगळं लक्षात येतं की आपण किती चुकीचं वागत असतो. त्या वयाची ती गरजही असते”.
यापुढे ते असं म्हणाले की, “आताच्या मुलांना टेलिव्हिजन, ओटीटी, इंटरनेट अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी भरकटलो होतो. पण सेक्स या गोष्टीबाबात कुठेही अधिक भाष्य होत नव्हतं. मग चोरून पुस्तकं वाचणं, हैदोस नावाचं मासिक होतं ते वाचणं. त्याच्यामध्येच मी खूप गुरफटत गेलो. त्यावेळी मुलं व मुलींची फार जवळीक नसायची. मुला-मुलींना लांबूनच बघणं असेल अशा गोष्टी घडत होत्या. मावा खाणं अशाप्रकारची व्यसनंही त्यावेळी होती. मी जर अजून नगरमध्येच असतो, तर कुठल्यातरी जेलमध्ये असतो. इतकं मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये भरकटत गेलो असतो. व्यसनं करायची, वरातीमध्ये नाचायला जायचं. लोकांकडून फुकट दारु मिळते म्हणून वरातीमध्ये नाचायचो. वाटेल ते चाळे करुन झाले. माझे वडील खूप उच्च पदावर काम करायचे. ते क्लास वन ऑफिसर होते. करोना काळामध्ये ते गेले. नगरला मी मावशीकडे राहायला होतो. माझी वागणूक वडील व मावशी यांच्या लक्षात आली. मग वडिलांनी मला पुन्हा पुण्यामध्ये बोलावून घेतलं”.