‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आठव्या आठवड्यात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेने एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं. कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कदरम्यान संग्रामच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्याला घरातील कोणतंही काम करता येणं शक्य नव्हतं. याशिवाय तो टास्कमध्ये देखील सहभागी होऊ शकला नसता. त्यामुळेच संग्रामला आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराचा निरोप घ्यावा लागला. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेला टास्क दरम्यान हाताला दुखापत झाल्याने घराबाहेर पडावं लागलं. (Sangram Chougule Health Update)
‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर संग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल असून त्याच्यावर सर्जरी करण्यात येणार असल्याचं त्याने व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं. थेट हॉस्पिटलमधूनच इन्स्टाग्रामवर लाईव्ह जात त्याने याबाबतची माहिती देत प्रेक्षकांशी संवाद साधला. संग्रामने त्याच्या हाताचे एक्स रे रिपोर्ट देखील सर्वांबरोबर शेअर केले आहेत. संग्राम चौगुलेच्या डाव्या हाताच्या मनगटाला जबरदस्त मार लागला आहे. आणि त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे.
व्हिडीओद्वारे संग्रामने असं म्हटलं की, ”माझी तब्येत ठीक आहे. ऑपरेशन अजून झालेलं नाही. रिस्टच्या बोला दुखापत झाली आहे. तीन ठिकाणी छोटे छोटे फ्रॅक्चर आहेत”. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरात असताना संग्रामच्या हातावर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही सांगण्यात आलं होतं. आणि काल संग्रामनेही याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अखेर संग्रामच्या हातावर शस्त्रक्रिया झाली असून तो सुखरुप असल्याचं समोर आलं आहे. संग्रामने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सर्जरी दरम्यानचे काही फोटो शेअर करत, “नमस्कार मंडळी. जसं तुम्हाला माहिती होतं की माझं ऑपरेशन होतं, ते नीट पार पडलं आहे”, अशी माहिती दिली आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सूरजच्या सहानुभूतीवर पुढे गेलीस”, निक्कीने अंकिताला टोकलं, म्हणाली, “घाण गेम खेळत…”
‘बिग बॉस’च्या घरातील संग्रामचा खेळ सुरुवातीपासून प्रत्येकाला वीक वाटत होता. त्यातच रितेश भाऊंनीही भाऊच्या धक्क्यावर त्याच्या खेळाविषयी त्याची कानउघडणी केली होती. त्यातच आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यामुळे घरात आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने दोनच आठवड्यात खेळ आटोपता घेतला.