Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage : प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लगीनगाठ बांधली आहे. दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यांत प्रथमेशने व क्षितिजाच्या नववधूवराच्या लूकने लक्ष वेधून घेतलं आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रथमेश परबच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत होती. अशातच अभिनेता अखेर त्याच्या गर्लफ्रेंडसह सात फेरे घेत लग्नबंधनात अडकला आहे.
प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाच्या व्हिडीओने व फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रथमेश व क्षितिजा यांनी जवळच्या नातेवाईकांच्या व कुटुंबियांच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात हा सोहळा उरकला. यावेळी प्रथमेशने शेरवानी परिधान केलेली पाहायला मिळाली. तसेच डोक्यावरील फेट्यामुळे प्रथमेशचा हा नवऱ्या मुलाचा लूक लक्ष वेधून घेत होता. तर प्रथमेशच्या बायकोने लग्नसाठी खास पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. त्यावर तिने डिझाइनर ब्लाऊज परिधान केला होता. तसेच तिने घातलेल्या मोत्यांच्या दागिन्यांमुळे क्षितिजा खूप सुंदर दिसत होती.
अखेर प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा मराठमोळ्या पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला दोघांच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण होताच दोघांनी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले. कोणताही अवाढव्य खर्च न करता अत्यंत साधेपणाने त्यांनी त्यांचा साखरपुडा समारंभ उरकला. तसेच प्रथमेश व क्षितिजा यांच्या हळदी समारंभाचेही फोटो समोर आले.
प्रथमेश व क्षितिजा यांच्या प्री-वेडिंग शूटचे फोटोही विशेष चर्चेत राहिले. या शूटसाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला आहे, तर प्रथमेशने कुर्ता पायजमा व त्यावर लाल रंगाचे नक्षीकाम असलेलं मफलर घेतलं आहे. अथांग समुद्रकिनारी त्यांनी हे प्री-वेडिंग शूट केले असल्याचे पाहायला मिळत आहे.