Kishor Kadam home threat : मराठी सिनेइंडस्ट्रीतले लोकप्रिय अभिनेते किशोर कदम सध्या चर्चेत आहेत. फेसबुकवर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या राहत्या घरासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती. अंधेरेतील ते राहत असलेली इमारत सध्या पुनर्विकासाच्या मार्गावर आहे. पण या प्रक्रियेत बिल्डर तसंच सोसायटीतील काही सदस्यांनी त्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतले आहेत. तसंच त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार केल्याचंही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे. राहत्या घराला धोका असल्याचंही त्यांनी या पोस्टमधून म्हटलं. किशोर कदम यांच्या या पोस्टची काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दखल घेतली असून त्यांनी किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट शेअर करत सहकार सचिवांना यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
किशोर यांच्या या मदतीच्या पोस्टनंतर काही तासांतच देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या प्रकरणाची दखल घेतल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी पोस्ट करत असं म्हटलं की, “किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून, त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आहे. आपल्याशी ते संपर्कात राहतील”.

किशोर कदम यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं होतं की, “नमस्कार! मी किशोर कदम. गेली तीस-पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रांत मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये, रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करुन ठेवली आहे”.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ची बबिता सोशल मीडियापासून आहे दूर, कारण सांगत म्हणाली, “गेले १० दिवस हॉस्पिटल…”
पुढे त्यांनी म्हटलं आहे, “कमिटी मेम्बर्सनी काही महत्त्वाची कागदपत्रे, अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33 (12) B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हलपमेंटखाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे”, याव्यतिरिक्त त्यांनी संताप व्यक्त करत बिल्डरच्या आर्थिक ताकदीपुढे सर्वसामान्यांचे होणारे हाल यावरही आवाज उठविला आहे. शेवटी किशोर कदम यांनी मदतीचं आवाहन करत म्हटलं की, “या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती मी सर्वसामान्य माणसांतर्फे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे. किशोर कदम. कवी सौमित्र.”





