कलाकार त्यांच्या कामामधून प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा सतत प्रयत्न करतात. एखादी भूमिका गाजली की, प्रसिद्धी म्हणजे नक्की काय? याचा प्रयत्यही कलावंतांना येतो. मेहनत करुन सिनेसृष्टीत स्टार झालेले कलाकार बऱ्याचदा काही काळासाठी पडद्यावर दिसतच नाहीत. त्यामागे काम न मिळणं, ब्रेक किंवा डिप्रेशन अशी अनेक कारणं असण्याची शक्यता असते. असाच एक कलाकार गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यावर फारसा दिसलाच नाही. तो अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदाने त्याच्या सुपरहिट चित्रपटांमधून बॉलिवूडचा एक काळ गाजवला. मात्र यादरम्यानच्या काळात त्याच्याबाबत अनेक नकारात्मक चर्चा झाल्या. याचबाबत आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने भाष्य केलं आहे. (actor Govinda wife blame Bollywood)
बॉलिवूडमध्ये कोणताच मध्यमवर्गीय अभिनेता टिकू शकत नाही असा दावा गोविंदाच्या पत्नीने केला आहे. इतकंच काय तर गोविंदाबरोबर राजकारण करण्यात आलं असंही तिचं म्हणणं आहे. ‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, “ते लोक गोविंदाबाबत अफवा पसरवायचे. तो सेटवर जायचा. लोक त्याच्या मागून खूप चर्चा करायचे. गोविंदाबरोबर राजकारण तर बरंच झालं”.
“गरीब व्यक्तीला मिळालेली प्रसिद्धी व यश कोणालाही बघवत नाही. त्याच्या बऱ्याच चित्रपटांचं प्रदर्शन थांबवण्यात आलं. पण असं का? हे सगळं करणारा एक सुपरस्टारच होता. मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही. पण इंडस्ट्रीमध्ये बरंच राजकारण आहे. गोविंदाचं इथे कोणीच गॉडफादर नव्हतं. तो विरारमधून एकटाच आला आणि स्टार झाला. तुमच्या नशिबात जर स्टार होणं असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही हे मी माझ्या मुलांनाही सतत सांगते”.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस, सुंदर फोटोशूट करत दाखवला चेहरा, नाव आहे…
पुढे सुनीता म्हणाली, “मुलांसाठी गोविंदा फिल्मइंडस्ट्रीमधील कोणालाही मदतीसाठी फोन करणार नाही. इंडस्ट्रीमधील कोणीच गोविंदाबरोबर उभं राहिलं नाही, त्याला मदत केली नाही. पण तो स्टार झाला”. गोविंदा सेटवर उशीरा येतो, विचित्र वागतो अशा अनेक चर्चा खूप काळ सुरु झाल्या. मात्र मुकेश खन्ना यांच्या एका शोमध्येही गोविंदाने याबाबत कबुली दिली होती. गोविंदा म्हणालेला, “मी सेटवर कधीच वेळेवर गेलो नाही. दिलीप कुमार यांना मी फॉलो करायचो. मी सेटवर जोपर्यंत सगळ्यांशी जुळवून घेत नाही तोपर्यंत मी तिथे जायचो नाही”. पण गोविंदाच्या पत्नीने त्याला योग्य ती वागणूक मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.