‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. महाराष्ट्रातील तमाम महिलांचे ते सगळ्यात आवडते भावोजी आहेत. पण इथवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे. आज कामानिमित्त ते अनेक दौरे करताना दिसतात, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यांचे शुभचिंतक, चाहते आहेत. आज रंगभूमी दिनानिमित्त आदेश बांदेकर यांनी त्यांच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. (Aadesh Bandekar Video)
हाडाचा रंगकर्मी असलेल्या एका चाहत्यांची आणि आदेश बांदेकरांची सोलापूर मुंबई प्रवासादरम्यान भेट झाली. या भेटीचा एक छान व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यांत गुरु वठारे या त्यांच्या चाहत्यांची भेट आणि भेटीदरम्यान त्यांनी सांगितलेल्या आठवणी शेअर केल्या आहेत. व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकर म्हणाले,
“सोलापूर मुंबई प्रवासात ट्रेनमधे नाट्यव्यवस्थापक आणि मित्र गुरू वठारे यांची अचानक भेट झाली ..गुरू वठारे यांनी रंगभूमीदिनामित्त व्यक्त केलेल्या भावना”.
त्या चाहत्याने आदेश बांदेकरांना मिठी मारत म्हटलं, “नाट्यस्पर्धेला २०१५ साली मी परीक्षक होतो. पंधरा नाटकं पाहिल्यानंतर सोळाव्या नाटकाच्या मध्यांतराला मला पॅरालिसिसचा झटका आला. त्यावेळी माझी डावी बाजू पूर्ण गेली होती. सोलापूरचे माझे मित्र बडवे यांनी आदेश दादांना फोन केला आणि सांगितलं ठाण्याला गुरूला जाऊन भेटा, आणि उपचारांबाबत डॉक्टरांसह चर्चा करा. आदेश दादा तेव्हा उद्धव ठाकरे सरांसह शिवसेना कार्यालयात मीटिंग करत होते ती मीटिंग सोडून ते तातडीने हॉस्पिटलमध्ये आले. आणि डॉक्टरांसह चर्चा करून त्यांनी योग्य उपचार करण्याची विनंती केली. आज मी आदेश दादांमुळे प्रवास करतोय, अजूनही मी नाटक जगतोय. आजही मी भरत जाधव यांच्या ‘अस्तित्व’ नाटकाच्या शुभारंभासाठी सोलापूर ते दादर हा दौरा करतोय. आज माझे बरेच हितचिंतक आहेत, पण आजही माझ्या मोबाईलचा वॉलपेपर हा आदेश दादांनीं मला मारलेली मिठी हाच आहे. मुंबईत काही अडचण अली तरी मी आदेश दादांना हक्काने सांगतो.
यावेळी आदेश बांदेकर म्हणाले, “आज ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिनादिवशी एका हाडाच्या रंगकर्मीची झालेली ही भेट याहून मोठ्या शुभेच्छा असूचं शकत नाहीत. मला असं वाटतंय असे निस्वार्थी रंगदेवतेवर प्रेम करणारे गुरूसारखे, कट्टर, हाडाचे रंगकर्मी आहेत त्यांच्यामुळे उत्तरोत्तर रंगभूमिला आणि रंगदेवतेला उत्कर्षाचेचं दिवस येणार आहे.”