RD Official Trailer : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा सुरु आहे ती म्हणजे थरारक अशा ‘आरडी’ चित्रपटाची. आरडी चित्रपटाच्या पोस्टरने, ट्रेलरने सध्या सर्वत्र हवा केली आहे. नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या ‘आरडी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रेमकथा, ऍक्शन, गाणी असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट येत्या २१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अर्थातच या चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढवली.
तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. अशा एखाद्या चुकीबद्दल माफी न मागितल्यास पुढे त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच ध्यानी मनी सुद्धा नसलेल्या विचित्र परिणामांची थरारक गोष्ट ‘आरडी’ या चित्रपटात मांडण्यात आल्याचं ट्रेलरवरुन दिसतंय. नावामुळेच आधीच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखी वाढलं आहे. थरारक आणि रंजक या पलीकडे चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येत नाही. रोमान्स, ऍक्शन, गाणी अशी मनोरंजनाची संपूर्ण मेजवानी या चित्रपटात आहे.
आणखी वाचा – वैष्णोदेवी परिसरात ओरीची दारू पिऊन पार्टी, हॉटेलमध्ये मिळाले पुरावे, पोलिसांत तक्रार दाखल कारण…
‘साद एंटरटेन्मेंट’, ‘कमल एंटरप्रायझेस’ यांनी ‘झेब्रा पिक्चर्स’ आणि ‘हेलिक्स प्रॉडक्शन्स’ यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे,विजयकांता दुबे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ला अधिकाधिक पुरस्कार न मिळण्यावरुन प्रेक्षकांची नाराजी, मालिका अव्वल स्थानावर तरीही…
‘आरडी’ या चित्रपटात नव्या दमाचे कलाकार असले तरी त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. उलट एक वेगळा प्रयोग व्यावसायिक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरवरुन दिसत आहे. त्यामुळे ‘आरडी’ या चित्रपटाची नेमकी कथा काय असा प्रश्न या ट्रेलरने निर्माण केला आहे.आता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी २१ मार्चला चित्रपटगृहात जावं लागणार आहे हे मात्र नक्की.