Aathvi A Web Series : शाळा… शाळा म्हटलं की, जीवाला जीव देणारे मित्र आले आणि या मित्रांसह मैत्रीच्या अनोख्या जगाची दुनियादारीही आलीच. याच दुनियादारीत मज्जामस्ती आली अन् त्याचबरोबर अभ्यासही आलाच आणि अभ्यास म्हटला की ‘हुशार’ व ‘ढ’ असा भेदभावदेखील आलाच. शाळेतल्या याच ‘हुशार’ आणि ‘ढ’ विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्यातील प्रेम व मैत्री या भावभावनांचं विश्व उलगडून दाखवण्यासाठी ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल एक नवी कोरी सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि या सीरिजचं नाव आहे… ‘आठवी अ’.
या सीरिजमध्ये डोंगरावरच्या छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट सांगण्यात आली आहे. आपण ‘आठवी अ’ मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ‘आठवी अ’ ही सीरिज.
नुकताच या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज आभ्या आणि त्याच्या मित्रांचा परगावच्या शाळेतील पहिला दिवस आहे. एकीकडे नवीन दप्तर, नवीन कपडे, नवीन पुस्तकं घेण्यासाठी ‘आभ्या’ उत्साही आहे, तर दुसरीकडे ‘इक्या’ने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारत लपून बसला आहे. अशा अनेक गंमतीजमती करत शाळेत जाण्यासाठी आभ्या, मध्या, इक्या, किरण्या, रेश्मा आणि पल्लवी ही मित्रांची टोळी खूपच उत्सुक आहे. त्यामुळे नवीन शाळेच्या नवीन मित्रांमध्ये मित्रांची ही टोळी कशी रमणार हे या सीरिजच्या पहीला भागात पाहता येणार आहे.
दरम्यान, ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, मीडिया वन सोल्युशन्स आणि शौरिन दत्ता निर्मित ‘आठवी अ’ ही नवी कोरी वेबसीरिज आजपासून चाहत्यांच्या भेटीला आली असून ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलवर ही सीरिज पाहता येणार आहे. त्यामुळे या सीरिजची प्रत्येक नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.