मराठी सिनेसृष्टीसह आता बॉलिवूडमध्येही लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह ती लग्नबंधनात अडकणार आहे. इरा व नुपूर यांचा शाही विवाहसोहळा ३ जानेवारी २०२४ रोजी थाटामाटात संपन्न होणार आहे. (Aamir Khan Daughter Ira khan Wedding)
इराच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात विशेष म्हणजे सगळ्या विधींमध्ये मराठी संस्कृती व पारंपरिकपणा पाहायला मिळत आहे. अशातच इराला हळद लागली असून इराच्या घरची मंडळी नुपूर शिखरेच्या घरी उष्टी हळद घेऊन जाताना दिसत आहेत. नुपूरच्या घरी हळदी समारंभाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतेच हळदी समारंभासाठी तयार झालेल्या खान परिवाराचे व्हिडीओ समोर आले आहेत.
इराची उष्टी हळद घेऊन आमिर खानची पत्नी किरण राव व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता नुपूरच्या घरी पोहोचली आहे. आमिर खानच्या लेकीच्या लग्नात त्याची पत्नी किरण राव हिनेही सहभाग घेतलेला पाहायला मिळत आहे. किरण राव व रीना दत्ता यांनी लेकीच्या लग्नपूर्वीच्या विधींसाठी खास तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी दोघींनी नऊवारी साडी परिधान करत केसात गजरा माळलेला पाहायला मिळत आहे. दोघींचा व इतर कुटुंबीयांचा हा पारंपरिक अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यावरुन इरा खानचं मराठमोळ्या पद्धतीने लग्नसोहळा उरकणार असल्याचं समोर आलं आहे.
खान व शिखरे कुटुंबिय नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करणार आहेत. येत्या नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी इरा व नुपूर यांचा विवाहसोहळा ताज लॅंड्स एंड बांद्रा येथे पार पडणार आहे. तर त्यानंतर दोन वेगवेगळे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहेत. एक रिसेप्शन हे दिल्लीत असणार आहे तर दुसरं रिसेप्शन हे जयपूरमध्ये असल्याचं म्हटलं जातं आहे. इरा व नुपूर २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.