गेली अनेक वर्ष मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे सचिन खेडेकर. चिमणी पाखरं, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श सारखे सुपरहिट सिनेमे देणारे सचिन खेडेकर मराठीसह हिंदी, साऊथसह अन्य भाषिक सिनेमा व वेबसिरीजसमध्येही दिसले असून विविध भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सचिन खेडेकर सध्या छोट्या पडद्यावर ‘कोण होणार करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत असून मनोरंजनसृष्टीसह विविध घडामोडींवर आपलं स्पष्ट मत मांडतात. (sachin khedekar)

सचिन खेडेकर भलेही हिंदी व अन्य भाषिक सिनेमांमध्ये आपल्याला दिसत असले, तरी गेल्या ४ ते ५ वर्षांपासून ते मराठी सिनेमांमध्ये दिसले नाही. यावर व्यक्त होत ते म्हणाले, बऱ्याचदा मला मराठी सिनेमांसाठी विचारणा होत असते; पण आपल्याकडे एकतर ऐतिहासिक सिनेमा नाही तर इंग्लंडला जाऊन मराठी सिनेमा असे दोनच भाग राहिले. म्हणजे इथे राहिलात तर ऐतिहासिक सिनेमा करायचा किंवा इंग्लडमध्ये जाऊन मुंबई-पुण्यातल्या गोष्टी सांगायच्या. मला हे करता आलेलं नाही. (sachin khedekar on marathi cinema)
पण यात काही अपवाद असल्याचे सांगत सचिन खेडेकर म्हणाले, सध्या ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’ असे काही सिनेमे उत्तम होत असून या प्रवाहातील सिनेमा पुन्हा यावा याची मी वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मालिकांमध्ये री-एन्ट्री करण्याबाबत ते म्हणाले, टीव्ही माध्यमानंच मला नट म्हणून ओळख दिली. मी त्या काळातला टेलिव्हिजन अभिनेता आहे; ज्यावेळी कलाकारांना त्यांच्या नावानं ओळखलं जायचं. मला मालिकांसाठी विचारणा होत असते, जर मर्यादित भागांची मालिका मिळाली तर मी नक्की करेन.