Kiran Gaikwad and Vaishnavi Kalyankar Wedding : मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. सोशल मीडियावर या कलाकारांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच आणखी एका कलाकार जोडीने जाहीर प्रेमाची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी म्हणजे अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर. किरण व वैष्णवी यांनी सोशल मीडियावर थेट प्रेमाची कबुली देत सुखद धक्का दिला. देवमाणूस फेम या जोडीने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच किरण व वैष्णवी यांच्या लग्नाची तारीख अखेर समोर आली आहे.
किरण व वैष्णवी येत्या १४ डिसेंबर २०२४ ला लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. वैष्णवी कल्याणकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला टॅग केलेली एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये वैष्णवीचं अभिनंदन केलं आहे. आणि त्याखाली १४-१२-२४ ही तारीख लिहीत सेव्ह द डेट असं लिहिलं आहे. #weddingvibes असा हॅशटॅगही यावेळी वापरला आहे. यावरुन किरण व वैष्णवी येत्या १४ डिसेंबरला बोहोल्यावर चढणार आहेत. किरण व वैष्णवीच्या लग्नाची तारीख समोर आली असून सगळ्यांच्या नजरा आता त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत.

“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्री मंडळातल्या बैठका होत राहतील. मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो. ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’ वैष्णवी कल्याणकर”, असं कॅप्शन देत किरणने वैष्णवीबरोबरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यांच्या या जाहीर कबुलीनंतर सिनेविश्वातून आणि चाहतेमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला.
किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस २’ मध्ये एकत्र काम केले होते. वैष्णवी देखील मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा असून तिने ‘देवमाणूस २’, ‘तू चाल पुढं’, ‘टिकली’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. शिवाय ती ‘बांबू’ या चित्रपटातही झळकली. तर ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे किरण गायकवाडला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय किरणने चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.