झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी होतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एजे व लीला यांच्यात आता कुठे तरी प्रेम बहरत असतानाच आता एजेंवर मोठं संकट आलं आहे. एजेंना अटक होणार असल्याचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. (Navri Mile Hiltlerla Serial Updates)
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, श्वेता आणि तिची आई एजेच्या घरी आल्या आहेत. श्वेताची आई म्हणते, “तुमच्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.” त्यानंतर “जर एजेंना माझ्याशी लग्न करायचं नसेल, तर मलासुद्धा जगण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये”, असे म्हणून श्वेता जीव देण्याचा प्रयत्न करते. ते पाहताच एजे ती औषधाची बाटली फेकतो. श्वेता पडत असताना एजे तिला धरतो. श्वेता म्हणते, “तुमच्याशी लग्न करता आलं नाही; पण तुमच्या मिठीत मरता येतंय मला.” त्यानंतर ते श्वेताला घेऊन जातात.
पुढे एजेच्या घरी पोलिस येतात. यावेळी आजी रडत आहे आणि ती दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना समजावत आहेत. यादरम्यान, लीला तिच्या माहेरी आहे. लीला माहेरी असताना तिच्या घरी पत्रकार येतात आणि ते एजेंच्या अटकेविषयी लीलाला विचारतात. “एजेमुळे एका मुलीने आत्महत्या केली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आता ते जेलमध्ये आहेत. यावर तुमचं काय म्हणणं आहे?” असं पत्रकार लीलाला विचारतात. पत्रकारांचे ही बोलणे ऐकल्यानंतर तिला धक्का बसला आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजे आणि श्वेताचे लग्न ठरलेले असते. मात्र, लीलाची बहीण रेवतीला किडनॅप करून, तिला एजेबरोबर जबरदस्तीने लग्न करायला सांगितले जाते. लीला श्वेताला बेशुद्ध करून, स्वत: तिच्या जागी बसते आणि एजेबरोबर लग्न करते. त्यामुळे आता लीला एजेंना सुखरूप सोडवणार का? यादरम्यान दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे मालिकेच्या आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे