दिवाळीच्या सणाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या सण म्हटल्यावर फराळ आणि फटाके या दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात. फटाके फोडणे हे लहान मुलांसह अनेकांना आवडते. मात्र हे फटाके फोडताना काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा मोठा अनर्थही होऊ शकतो. असंच काही झालं होतं ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका फेम अभिनेत्री वल्लरी विराजबरोबर. वल्लरी विराजने लहानपणी फटाके फोडतानाच्या तिच्या अपघताबद्दल सांगितले आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात तिने लहानपणीच्या फटाके फोडताना झालेल्या अपघाताबद्दल सांगितले आहे. तसेच सर्वांना दिवाळीत फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहनदेखील केलं आहे. (Vallari Viraj Diwali Memory
या व्हिडीओमध्ये लीला म्हणजेच वल्लरी विराजने तिच्या या आठवणीबद्दल असं म्हटलं आहे की, “दिवाळीनिमित्त मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवतो, तो मी तुम्हाला सांगते. लहान असताना आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी फटाके फोडत होतो. तर अनार (पाऊस) फटाका जो त्रिकोणी असतो आणि तो उभाच लावायचा असतो. तेव्हा मोठे सांगत होते, की आम्ही असतानाच तुम्ही फटाके फोडा. एकट्याने फोडू नका. पण आम्ही हट्टाने एकट्यात फटाके फोडायला घेतले. मज्जा म्हणून आम्ही फटाके फोडायला गेलो आणि तो अनार (पाऊस) मी उभा लावण्याऐवजी आडवा लावला. तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं काय करायचं. तो अनार उभा लावण्याऐवजी आडवा लावला आणि तो फुटला आणि त्यामुळे माझ्या आईची साडी पेटली”.
आणखी वाचा – मृणाल कुलकर्णींच्या आईचे निधन, भावुक होत म्हणाल्या, “काही व्यक्त होण्याची ताकद नाही पण…”
यापुढे तिने म्हटलं आहे की, “आईच्या साडीने मागून पेट घेतला आणि खूप गोंधळ झाला. कशीतरी ती आग विझवली. नाशिबाने माझ्या आईला काही झालं नाही. फक्त साडीच काय ती जळली”. यापुढे तिने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करत असं म्हटलं आहे की, “यानिमित्ताने मी एवढंच सांगेन, लहान मुलं-मुली फटाके फोडतील. तर काळजीपूर्वक करा आणि मोठे आजूबाजूला असतील तरच फटाके फोडा. माझ्याबरोबर जसा अपघात होता होता राहिला, तसं तुमच्याबाबतीत होऊ नये म्हणून मी हे सांगत आहे”.
आणखी वाचा – “काय दिवे लावणार कुणास ठाऊक?”, पत्नीने कुशल बद्रिकेला चिडवलं, अभिनेताही म्हणाला, “संध्याकाळी…”
दरम्यान, लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी आपल्या अभिनयाने सर्वांचेच मन जिंकत आहे. अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.