Sai Lokur Viral Video : ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. तिने या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. सोशल मीडियावर ही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सई मात्र कुठेही झळकली नाही. कालांतराने तिने तीर्थदीप रॉय बरोबर लग्न सोहळा उरकला. सई तिच्या लग्नामुळेही पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली.
कलाविश्वात यश मिळवल्यावर सईने वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ३ वर्षांनंतर म्हणजेच १७ डिसेंबर २०२३ रोजी सईने तिच्या बाळाचं स्वागत केलं. आपल्या बाळाची विशेष काळजी घेण्यासाठी सईने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. सध्या सई बंगळूर येथे स्थायिक आहे. ती तिच्या सासरी राहत असून लेकीसह विशेष वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करणाऱ्या सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवरात्रोत्सव स्पेशल दुर्गा पूजेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सासरकडून सई बंगाली असून तिने बंगाली परंपरेला प्राधान्य देत नवरात्रोत्सवात बंगाली नृत्यप्रकाराचा आनंद लुटला आहे. दुर्गमातेसमोर तिने धुनुची नृत्य सादर केलेला एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. याखाली कॅप्शन देत सईने म्हटलं आहे की, “मी आयुष्यात प्रथमच मूळ ढाक संगीताबरोबर धुनुची नृत्य सादर केले आणि तो किती विलक्षण अनुभव होता, हे सांगू शकत नाही. मी माझ्या नवीन बंगाली परंपरांवर पूर्णपणे प्रेम करत आहे, जगत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे”.
आणखी वाचा – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने रितेश देशमुखला धक्का! न्यायाचे आवाहन करत म्हणाला, “गुन्हेगारांना कठोर…”
सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. याविषय़ी तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखतदेखील दिली होती. “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय,” असं सईने या मुलाखतीत सांगितलं होतं.