Marathi Language : ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ कुसुमाग्रज्यांच्या या ओळी वाचून प्रत्येक मराठी मनाचा आणि मराठी मन असलेल्या माणसाचा ऊर अभिमानाने भरुन येईल. कारण प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आता पूर्ण झाली आहे आणि ही इच्छा म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी बातमी सरकारने दिली आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. (Marathi Language Classical Status)
केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच सर्व स्तरातून सरकारचे कौतुक केले जात असून मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींनीदेखील याबद्दल आनंद साजरा केला आहे.

गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी व्हिडीओ शेअर करत याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “आपण ज्या भाषेत आपल्या भावना व्यक्त करतो, ज्या भाषेत आपण आपले विचार करतो आणि स्वप्न बघतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या २७-२८ वर्षात आपण मराठी गाणी व कविता ऐकल्या आणि आता अभिजात भाषेच्या दर्ज्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. यानिमित्ताने ज्या ज्या ज्येष्ठ लोकांनी आपली भाषा जपली आणि वेचली त्या सर्वांचे आभार. त्यांना सर्वांना वंदन आणि आपल्या मराठीलाही वंदन करतो”.
अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावेनेदेखील याबद्दल असं म्हटलं आहे की, “अभिजात भाषा, मराठी भाषा, केंद्र सरकार व मा. नरेंद्र मोदी यांचे आभार. तसंच अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे जे लढले त्या प्रत्येकाला मनापासून वंदन”. यासह सायली संजीव या अभिनेत्रीनेही नरेंद्र मोदी यांना मेन्शन करत “अभिमानस्पद” असं म्हटलं आहे. तसंच लेखक व गीतकार क्षितिज पटवर्धननेदेखील खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – मोठा धक्का! Bigg Boss Marathi मधून वर्षा उसगांवकर घराबाहेर, सदस्यांनाही झटका, नक्की कुठे चुकलं?
दरम्यान, देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. आता या अभिजात भाषांमध्ये मराठीचा समावेश झाला आहे. अभिजात हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटणे होय.