Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे असून येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शो चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाचा बिग बॉस मराठी शो अवघ्या ७० दिवसांत बंद होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या आणि अखेर या चर्चांवर स्वतः ‘बिग बॉस’नेच उत्तर दिलं आणि पूर्णविराम दिला. हा शो आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नुकताच फॅमिली एपिसोड पार पडला. (Ankita Walawalkar Emotional)
पहिल्यांदा, वर्षा ताईंची मनीषा बहीण येते. तिला पाहून वर्षा ताई खूप भावुक होतात. वर्षा यांची बहीण सर्वांची भेट घेते. मग अभिजीतची पत्नी आणि त्याच्या मुली भेटायला येतात. यावेळी “मला त्याच्यावर २०० टक्के विश्वास आहे, तू कोणाचाही विचार करू नकोस, चांगला खेळ, संपूर्ण जनता तुझ्या पाठीशी आहे” असं शिल्पा म्हणजेच अभिजीतची पत्नी त्याला सांगते. मग जान्हवीचा नवरा व मुलगा भेटायला येतात आणि मग एपिसोडच्या शेवटी डीपीचे वडील, पत्नी आणि आई घरात प्रवेश करतात.
आपल्या कुटुंबियांना पाहून डीपीसह घरातील सर्वानाच अश्रू अनावर होतात. अशातच आजच्या भागात अंकिताचे कुटुंब तिला भेटायला येणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये तिला भेटायला तिच्या दोन लहान बहिणी व तिचे वडील आले असल्याचे पाहायला मिळत आहे. अत्यंत भावुक व खूप हृदयस्पर्शी असा हा व्हिडीओ असून अंकिताही वडील व बहिणींना पाहून खूपच भावुक होते.
आणखी वाचा – 27 September Horoscope : शुभयोगामुळे ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ, नोकरी व व्यवसायात होणार नफा, जाणून घ्या…
या प्रोमोमध्ये सुरुवातीला अंकिताच्या बहिणी घरात प्रवेश करतात. त्यांना पाहून अंकिता भावुक होते. मग ‘बिग बॉस’ अंकिताला फ्रीज करतात आणि तेवढ्यात घरात तिच्या बाबांची एन्ट्री होते. बाबांना पाहून अंकिता ढसा ढसा रडू लागते. यानंतर बाप-लेक दोघेही भावुक होतात. तसंच यापुढे अंकिता ‘बिग बॉस’ला “आज तुमच्यामुळे बाबा पहिल्यांदा मुंबईत आले” असं म्हणते. दरम्यान, अंकिता व तिच्या कुटुंबियांचा हा व्हिडीओ खूपच ह्रदयस्पर्शी असून या व्हिडीओखाली अनेकांनी तशा कमेंट्सही व्यक्त केल्या आहेत.