Urmila Matondkar and Mohsin Akhtar Mir Divorce : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ती पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोट घेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांनी कोर्टात घटस्फोटाची याचिकाही दाखल केली आहे. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत होते, मात्र आता अचानक त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने खळबळ उडाली आहे. उर्मिला मातोंडकर व मोहसिन अख्तर मीर यांचा ३ मार्च २०१६ रोजी प्रेमविवाह झाला होता. हा एक आंतरधर्मीय विवाह होता, ज्यात कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यावेळी उर्मिला व मोहसीनच्या लग्नाची खूप खिल्ली उडवली गेली होती, कारण त्यांच्या वयात १० वर्षांचे अंतर होते. उर्मिलाने मोहसीनशी लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन केल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, उर्मिलाने असे न केल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.
उर्मिला व मोहसिन यांची पहिली भेट प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत झाली होती. दोघेही मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात भेटले होते. मोहसिन पहिल्या नजरेत उर्मिला मातोंडकरच्या प्रेमात पडला. दोघांचेही धर्म भिन्न होते, त्यांची विचारसरणीही वेगळी होती, पण प्रेमापुढे सारे भेद क्षुद्र ठरले. मोहसीन अख्तर मीर मुस्लिम आहे आणि उर्मिला हिंदू आहे, तरीही तो अभिनेत्रीशी लग्न करण्यावर ठाम होता. अखेर २०१६ मध्ये त्यांनी आधी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्नानंतर दोघेही अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. लग्नानंतर उर्मिला व मोहसीनने लाखो टोमणे सहन केले, पण प्रत्येक अडचणीचा सामना करुनही त्यांचे नाते कायम राहिले. अशा परिस्थितीत आता असे काय घडले की त्यांचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
‘आज तक’च्या रिपोर्टनुसार, उर्मिला व मोहसीन फार दिवसांपासून एकत्र राहत नाहीत. दोघेही वेगळे राहतात. त्यांचा घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. उर्मिला व मोहसीन यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली, पण त्यांना मूलबाळ झाले नाही. याबाबत चाहत्यांनीही या जोडप्याला अनेक प्रश्न विचारले. याबाबत उर्मिला एकदा बोलली होती. ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाली होती, “मी आई होण्याचा विचार करत आहे किंवा नाही. झाले तर होईल. मला त्याची अपेक्षा नाही. मी याचा विचार करत नाही असे नाही. प्रत्येक स्त्रीने आई होणे गरजेचे नाही. मातृत्व योग्य कारणांसाठी असावे. मला मुलं आवडतात. पण बरीच अशी मुलं आहेत ज्यांना आपल्या प्रेमाची व काळजीची गरज आहे. फक्त तुमच्या पोटीच मुले जन्माला आली पाहिजेत असे नाही”.
मोहसीन खान हा काश्मिरी मुस्लिम असून तो व्यावसायिक व मॉडेल आहे. त्याने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. तो ‘बीए पास’, ‘लक बाय चान्स’ आणि ‘मुंबई मस्त कलंदर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. मोहिसनचा भरतकामाचा व्यवसाय आहे आणि तो मनीष मल्होत्राच्या लेबलसाठी काम करतो. त्यांनी काश्मिरी भरतकामाचा व्यवसायही सुरु केला आहे.