Akshay Shinde Encounter Case : काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरुन गेला होता. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आणि या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला. या घटनेचे पडसाद सर्व क्षेत्रातून उमटल्याचे पाहायला मिळाले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले होते. बदलापूरमध्ये घडलेल्या ‘या’ प्रकरणावर मराठी कलाकारदेखील भडकल्याचे पाहायला मिळाले होते. मराठी कलाकारांनी यासंबंधित सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. (Vidisha Mhaskar on Akshay Shinde Encounter Case)
अशातच ‘या’ लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी पोलीसांमबरोबरच्या चकमकीत मारला गेला. ठाणे क्राइम ब्रांचच्या टीमकडून त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावरून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात या आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. या घटनेवर आता अनेक सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री विदिशा म्हसकरने यासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की व अभिजीतमध्ये जोरदार भांडण, दोघांनीही मैत्री तोडली, पण नेमकं झालं तरी काय?
विदिशा म्हसकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करणारा आरोपी महाराष्ट्र पोलिसांकडून मारला गेला आहे. यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत’ असं म्हटलं आहे आणि ही पोस्ट विदिशाने शेअर करत “खऱ्या आयुष्यातील सिंबा, सिंघम स्टोरी” असं म्हटलं आहे. तसंच या पोस्टद्वारे तिने आनंदही व्यक्त केला आहे. बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे याने पळून जाण्याचा कट रचल्याचा दावा करण्यात येत आहे. पण हा कटच त्याच्या जीवाशी आला आणि तो पोलिसांकडून मारला गेला. पण या कारवाईवर विरोधकांकडून आणि माजी अधिकाऱ्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा – 24 September Horoscope : मीन, कर्क,व तूळ या राशींसाठी मंगळवारचा दिवस शुभ, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
दरम्यान, विदिशा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. यापूर्वी विदिशाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतही तिनं खलनायिकेची भूमिका निभावली होती. त्यानंतर ‘रंग माझा वेगळा’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ अशा मालिकेत काम केलं.