कलर्सचा वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ’ हा रिअॅलिटी शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. अनेक टीव्ही कलाकार आपल्या उपस्थितीने या शोला चार चाँद लावताना दिसतात. पण या शोबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. एकीकडे शोच्या प्रत्येक भाग यशाच्या दिशेने झेप घेत असताना, दुसरीकडे मात्र सेटवर अनेक कलाकार जखमी होत आहेत. प्रथम रीम शेखचा चेहरा भाजला. गायक राहुल वैद्यही आगीत वेढलेले दिसले. अशातच आता सुदेश लाहिरी यांच्या दुखापतीबद्दलही एक बातमी समोर येत आहे. (Laughter Chef Set Accident)
कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘लाफ्टर शेफ’चा प्रोमो शेअर केला आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, राहुल वैद्य आपला जोडीदार अली गोनीबरोबर स्वयंपाक करत असताना त्याच्या चेहऱ्यावर आगीचा भडका येतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला राहुलचा आरडाओरडा करतानाचा आवाज येईल. त्याचबरोबर बाकीचे स्पर्धकही इतके घाबरतात की तेही ओरडू लागतात. राहुलची अवस्था पाहून निया शर्मा आणि जन्नत जुबेर यांच्या हातातून जेवण सटकते. हा व्हिडिओ खरोखरच भीतीदायक आहे. सध्या राहुल ठीक आहे, त्याला फारशी गंभीर दुखापत झालेली नाही. तो थोडक्यात बचावला आहे.
रीम शेखचाही चेहरा भाजला आहे, याचा प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे. रीम भारती सिंगशी बोलत होती आणि एका भांड्यात काहीतरी तळत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तेल उडते आणि यामुळे तिचा चेहरा भाजला असल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेनंतर सेटवरील सर्वजण रीमला पाहण्यासाठी धावतात. रीम स्वयंपाक करत असताना तिच्या चेहऱ्यावर गरम तेलाचे ठिपके पडले, ज्यामुळे डोळ्याजवळ तिच्या चेहऱ्यावर खुणा आल्या. नुकतेच रीमने तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे तिच्या चेहऱ्याची अवस्था दाखवली. या संपूर्ण अपघाताचा उल्लेखही तिने केला होता. या फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्यावर अनेक डाग आणि खुणा स्पष्ट दिसत आहेत.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शोमध्ये स्वयंपाक करत असताना सुदेश लाहिरीला चुकून नियाने चाकू मारला. त्यांच्या बोटातून सतत रक्तस्त्राव होत होता. त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. जखमी असूनही सुदेश लाहिरीने शूटिंग पूर्ण केले आणि बरे होण्यासाठी फक्त एक दिवस सुट्टी घेतली. दरम्यान, ‘लाफ्टर शेफ’ हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर सुरु आहे. या कार्यक्रमात सहा जोड्या स्वयंपाक करताना दिसत आहेत. त्यामध्ये कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा, जन्नत जुबेर आणि रीम, अली गोणी आणि राहुल वैद्य, अर्जुन बिजलानी आणि करण कुंद्रा, अंकिता लोखंडे आणि विकी जैन, निया शर्माची जोडी दिसत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंह करताना दिसत आहे.