बॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमिया याचे वडील आणि प्रसिद्ध संगीतकार विपिन रेशमिया यांचे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विपिन रेशमिया यांच्या धीरूभाई रुग्णालयात उपचार सुरू होते. वाढतं वय आणि आजारपणाशी ते गेल्या काही काळापासून झुंजत होते. अखेर बुधवारी त्यांचं निधन झालं. वडिलांच्या जाण्यामुळे हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. तसंच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. (Hiemsh Reshmiya Father Death)
काही वृत्तांनुसार, त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. हिमेश रेशमियाच्या कुटुंबातील एका व्यक्तीने विपिन यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे. हिमेश रेशमियाच्या वडिलांवर आज म्हणजेच गुरुवार १९ सप्टेंबर रोजी जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी सकाळी विपिन रेशमियाचा मृतदेह आधी घरी आणला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचे अत्यंदर्शन होणार आहे अशी माहिती वनिता यांनी दिली आहे.
विपिन हे हिमेशचे वडीलच नव्हते तर त्याचे गुरुही होते’, असे खुद्द हिमेशने एका मुलाखतीत सांगितले होते. याबद्दल हिमेश रेशमिया म्हणाला होता की, “माझे वडील, माझा देव माझे गुरू आहेत. माझ्या वडिलांनी मला जे शिकवले त्याचे प्रतिबिंब म्हणजे माझे संगीत आहे”. त्यामुळे आता वडिलांच्या निधनानंतर हिमेश रेशमियाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.
सलमान खानच्या चित्रपटातही विपिन रेशमिया यांनी संगीत दिले आहे. यादरम्यान त्यांची भेट हिमेश रेशमियाशी झाली. यानंतर सलमानने हिमेश रेशमियाला त्याच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटासाठी संधी दिली. नंतर ‘इंडियन आयडॉल १२’च्या दरम्यान आपल्या वडिलांबद्दल बोलत असताना हिमेश रेशमिया म्हणाला होता की, त्यांनी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्याबरोबरही एक गाणे तयार केले होते, जे कधीही रिलीज झाले नाही.
दरम्यान, विपिन रेशमिया यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (२०१४) आणि तेरा सुरूर (२०१६) ची निर्मिती केली होती. विपिन यांनी इन्साफ का सूरज (१९९०) नावाच्या रिलीज न झालेल्या चित्रपटासाठी संगीत दिले आहे.