Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुले ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरला. संग्राम चौगुले घरात शिरताच घरातील समीकरणं बदलतील आणि नवा राडा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
याबद्दल गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने संग्राम चौगुलेची शाळाही घेतली. तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून नाही तर माइल्ड कार्ड आहात असं म्हणत रितेशने संग्रामचे कान टोचले. त्यानंतर संग्रामने सोमवारच्या टास्कमध्ये त्याचा थोडा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी झालेल्या ‘जंगलराज’ या नॉमिनेशन टास्कमध्ये त्याने बंदूक हिसकावत सूरजला हरवले व त्यामुळे ‘टीम ए’ थेट नॉमिनेट झाली. संग्राम व सूरज यांच्या टास्कमध्ये संग्रामने सूरजकडून बंदूक खेचून घेतली. त्यामुळे निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज व वर्षा यांची टीम थेट नॉमिनेट झाली. याचाच राग मनात ठेवत निक्कीने आता संग्रामला घराबाहेर काढण्याची भाषा केली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत निक्की संग्रामला घराबाहेर काढणार असल्याचे म्हणत आहे. यावेळी ती संग्रामबद्दल डीपीला असं म्हणते की, “या घरात पहिल्या दिवसापासून आपण सगळे आहोत. पण हे (संग्राम) नव्हते. हे आत्ता आले आहेत. त्यामुळे माझ्या मनात यांना बाहेर काढायचाच विचार आहे. सॉरी पण हे माझं मत आहे. कारण या घरात पहिल्या दिवसापासून जशी आहे तशी आहे. आम्ही या घरात गेले ५० दिवस आहोत. त्यामुळे तुम्ही येऊन या घरात तुमचं नवीन साम्राज्य बनवू शकत नाही आणि हे मी तरी बनवू देणार नाही. त्यामुळे मी ठाम आहे की, आमच्या टीमपैकी कुणी या घराबाहेर जावं. मला खूप दु:ख होईल. मी जान्हवीबरोबर बोलत नसली तरी मला दु:ख होईल”.
दरम्यान, सोमवारच्या ‘जंगलराज’ टास्कमध्ये शेवटच्या फेरीत संग्रामने सूरजकडची बंदूक खेचून घेत त्याला नॉमिनेट केले आणि ‘टीम ए’चा ‘टीम बी’विरुद्धचा प्लॅन फिस्कटला. त्यामुळे आता या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, अरबाज, निक्की, जान्हवी व वर्षा असे एकूण आच सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठडव्यात या घरातील कुणाचा प्रवास संपणार हे शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.