Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात होऊन आता सात आठवडे पूर्ण व्हायला आले आहेत. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता उर्वरीत सदस्यांमध्ये या घरात टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या लढतीसाठी ‘बिग बॉस’कडून अनेक टास्क स्पर्धकांना टास्क दिले जातात. दर आठवड्यात पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडतो. साधारणत: सोमवार-मंगळवारीच या आठवड्यात नेमकं कोणं नॉमिनेट होणार? हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट होतं. (Bigg Boss Marathi 5 Nomination)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात ‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला. स्पर्धकांना घरातील अन्य सदस्यांचे फोटो गळ्यात घालून संबंधित स्पर्धकाला नॉमिनेशनपासून वाचावायचं की नाही हा निर्णय घ्यायचा होता. ‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क खेळताना ‘बिग बॉस’च्या घरात अनेक ट्विस्ट आले. सदस्यांना बझर वाजल्यावर जादुई दिव्याजवळ सर्वात आधी पोहोचणं गरजेचं होतं. या टास्कमध्ये निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अशातच आर्याने निक्कीबाबत केलेल्या चुकीमुळे ती घरातून बाहेर जाणार की काय अशा चर्चाही रंगताना दिसून येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात शुक्रवारी पार पडलेल्या टास्कमध्ये मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. आर्या व निक्की यांच्यामध्ये टास्कदरम्यान धक्काबुक्की झाली आणि यात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. यानंतर निक्कीने आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर ‘बिग बॉस’ने आर्याला जेलची शिक्षा दिली. ही शिक्षा देत ‘बिग बॉस’ने असंही सांगितलं की, आर्याला काय शिक्षा द्यायची याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल.
दरम्यान, आर्याने ‘बिग बॉस’च्या घरातील हिंसा न करण्याचा निर्णय मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आर्याने निक्कीबरोबर जे काही केलं ते योग्यच आहे असं म्हणत अनेकांनी तिच्या कृतीचे समर्थन केलं आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये तिला शिक्षा होणार असल्याचे दिसून येत आहे. आता ही शिक्षा नेमकी काय असणार? तिला या घरातून बाहेर तर जावं लागणार नाही ना? अशा चर्चा होताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या भाऊचा धक्का पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.