‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अल्पावधीतच हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. या पर्वातील सर्व स्पर्धक सतत वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत. स्पर्धकांमधील सततचे वाद आता प्रेक्षकांनाही खटकू लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर ‘बिग बॉस’च्या घरात टीम ए व टीम बी असे दोन गट पडले असून दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र सतत टीम ए चा पारडं जड असल्याने टीम बी वर त्याचा परिणाम होत असल्याचं पाहून प्रेक्षक मंडळीही नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. (surekha kudachi on bigg boss marathi season 5)
तर सदर टीमला याचा जाबही कोणी विचारत नसल्याने प्रेक्षक मंडळी वैतागले आहेत. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने दोन गट पाडले होते. यामध्ये टीम ए मधल्या वैभवला टीम बी मध्ये जायला सांगितले होते आणि टीम बी मधील सूरजला टीम ए मध्ये जायला सांगितले होते. दोन्ही टीम आपापल्या परीने खेळत असताना ब्रेकमध्ये वैभवने जाऊन अरबासह संपर्क साधला आणि हे साऱ्यांनाच खटकलं. यामुळे टीम बी साठी खेळत असतानाही वैभवने हे करणं चूक होतं असं अनेकांचे म्हणणं होतं. शिवाय टीम ए च्या म्हणण्यानुसार टीम बी आता वैभवलाच नॉमिनेट करणार असं वाटत असताना टीम बी ने वैभवला सेफ करत माणुसकी दाखवली त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुकही झालं.
या सर्व प्रकरणावर आता ‘बिग बॉस’ फेम आणि मराठमोळी लावणी क्वीन अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी केलेलं भाष्य चर्चेला आहे सुरेखा कुडची यांनी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांबाबत केलेलं भाष्य लक्ष वेधून घेत आहे. “गद्दार कोण?. काल टास्क मधे दोन ग्रुप पाडले गेले. आपल्या सूरजला निक्कीच्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलं आणि वैभवला अभिजितच्या टीममध्ये. ब्रेकमध्ये वैभव व अरबाज बोलत असताना आवाज म्युट का झाला?, काही शिजत होत का?”, असा सवाल त्यांनी केला आहे.
पुढे त्या असंही म्हणाल्या आहेत की, “तेच आपला सूरज मात्र प्रामाणिकपणे त्याच्या टीमबरोबर खेळताना दिसला. वैभवला कॅप्टन्सीमधून बाहेर काढणार असं निक्कीची टीम म्हणत होती पण दुसऱ्या टीमने त्याला बाहेर काढल नाही. इथेच त्यांचा मोठेपणा कळतो. वाह टीम अभिजित ग्रेट आहात सगळे”, असं म्हणत टीम बीचं कौतुक केलं आहे.