Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात धुमाकूळ घालणारा एकमेव स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण. एका छोट्याशा खेडेगावातून रिल स्टार म्हणून टिकटॉकच्या दुनियेत राज्य करणाऱ्या सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. विनोदी रील व्हिडीओ बनवत त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर तुफान सक्रिय असलेला सूरज ‘बिग बॉस’च्या घरात इतर स्पर्धकांसह उत्तम खेळ खेळताना दिसून येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजचा खेळ पाहून त्याने साऱ्यांचीच मन जिंकली आहेत. सबंध महाराष्ट्रातून सूरजवर भरभरुन प्रेम केलं जात आहे. पहिली दोन आठवडे सूरज शांत होता मात्र ‘बिग बॉस’ आणि प्रेक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिलं. याशिवाय रितेश देशमुखने सूरजच्या खेळाचं कौतुक केलं आणि त्यानंतर सूरज जोमाने खेळू लागला.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, अहोरात्र मेहनत करणारा सूरज आता ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील त्याचा खेळ प्रेक्षकांना आवडतोय. सूरजला खेळ जरी नीट कळत नसला तरी माणूस म्हणून तो किती योग्य व उत्तम आहे याची अनेक उदाहरणं त्याने ‘बिग बॉस’च्या घरात दिली आहेत आणि यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही होताना पाहायला मिळतोय. सूरजने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेम कहानी बाबत नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात भाष्य केले आहे. सूरजने प्रेमात मिळालेल्या धोक्याबाबत भाष्य करत त्याचं मन मोकळं केलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की सूरजला म्हणते, “तुला प्रेमात धोका मिळाला?, आणि कधी”, यावर सूरज म्हणतो, “हो मिळाला”. निक्की पुढे म्हणते, “तू प्रेम केलं होतं. तिने बुक्कीत टेंगुळ तर नाही दिलं ना?”. यावर सूरज म्हणतो, “नाही. माझ्याबरोबर चांगली राहायची. चांगली बोलायची. नंतर तिला गोरापान चांगला मुलगा आवडला तर मला सोडून गेली. गोलीगत धोका मला दिला. मला खूप राग आला आणि मग मी ठरवलं स्वतःच काहीतरी करावं. मग मी मोठा स्टार झालो. लोकांच्या मनावर राज्य केलं. माझी गाणी सर्वत्र वाजतात”.
यावर निक्की विचारते, “त्यानंतर तू कधी बघितलं का तिला. तिचं नाव काय आहे?”, यावर सूरज नाही असं बोलतो. सूरज म्हणतो, “आता नाही. तिचं आता चांगलं सुरु आहे. ते पाहून खूप भारी वाटत आहे. तिच्या आयुष्यात माझं पिल्लू खुश आहे”, असंही तो म्हणत लाजतो.